
नगरमध्ये महसूल कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून पाचव्या दिवशीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच आहे. तसेच राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत 23 जुलै रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केल्याचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे ही बैठक प्रलंबित मागण्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा, अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देत आदेश निर्गमित करण्यात यावे, महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे आदींसह विविध मागण्या केल्या आहेत. यी मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे, माजी अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे व उपाध्यक्ष अशोक मासाळ, संतोष झाडे, जिल्हा सरचिटणीस स्वप्निल फलटणे, अक्षय फलके यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशी संघटनेच्या वतीने उपोषणस्थळी स्फुर्ती गीत गाण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या संदर्भात 23 जुलै रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केल्याचे पत्र दिले आहे. या बैठकीत संघटनेचे 5 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत ठोस भूमिका व त्याबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री घेतील अशी अपेक्षा असल्याने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.