मुंबईसह राज्यातील वाळूमाफियांवर कारवाई करणार, राज्य सरकारचा इशारा

मुंबईसह राज्यातील किनारपट्टी भागात बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे समुद्रकिनारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीवरील वाळूमाफियांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिला.

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील किनारपट्टीवरील वाळूमाफियांचा प्रश्न उपस्थित केला. बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे समुद्रकिनाऱयांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, ज्यामुळे समुद्रकिनारे पर्यटक आणि सामान्य जनतेसाठी निरुपयोगी झाले आहेत. या माफियांवर कडक कारवाई करावी आणि बंदर विभागाकडून संपूर्ण माहिती मिळवून बाधित किनारी भागात पुन्हा वाळूचा भरणा करावा जेणेकरून समुद्रकिनारे जनतेसाठी चालण्यायोग्य होतील.

  • या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वाळूमाफियांनी बसवलेले सर्व बेकायदेशीर पंप 15 दिवसांच्या आत जप्त करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत. जर तहसीलदारांनी 15 दिवसांच्या आत वाळूमाफियांवर कारवाई केली नाही तर संबंधित तहसीलदारांवरही कारवाई केली जाईल. संबंधित विभागांना कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि मुंबईतील किनारपट्टी भाग पुन्हा चालण्यायोग्य करण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेऊन ठोस पावले उचलली जातील.