दिल्लीची हवा बनली विषारी; विद्यार्थ्यांना मास्कसक्ती, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या बसेसवर बंदी

दिल्लीची हवा अत्यंत विषारी बनल्याचे समोर आले आहे. प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्यामुळे पहिली ते पाचवीच्या शाळा ऑनलाइन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर सहावीच्या पुढील वर्गात शिकणाऱया विद्यार्थ्यांना मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसेच मैदानी खेळ आणि इतर ऑक्टिव्हिटी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बसेसना दिल्लीत येण्यास बंदी घालण्यात आली असून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांसह बीएस-4 डिझेल बसना यातून सूट देण्यात आली आहे.

दिल्लीतील 39 प्रदूषण निरीक्षण केंद्रांपैकी 32 निरीक्षण केंद्रांनी हवेची गुणवत्ता प्रचंड घसरल्याचे निरीक्षण नोंदवले. एक्यूआय अत्यंत गंभीर पातळीवर गेल्याचे म्हटले असून या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. या विषारी हवेमुळे श्वसनाचे आजार जडण्याचा धोका असून नागरिकांनी मार्ंनग वॉक टाळावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. शाळांसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून मैदानी खेळ पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळांमध्येच वाचन, चित्रकला, हस्तकला किंवा चेस आणि पॅरम अशा खेळांसाठी प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे.

अमेरिकन सॅटेलाइटमधूनही दिसला प्रदूषणाचा विळखा

अमेरिकन शास्त्रज्ञ हिरेन जेठवा यांनी 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीची सॅटेलाइट इमेज शेअर केली. यात संपूर्ण दिल्लीत दाट धुरके दिसत आहे. हिरेन हे अमेरिकेतील मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एरोसोल रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ आहे. नासाने हिरेन यांचे पह्टोही शेअर केले आहेत. दरम्यान, आज दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 411 एक्यूआय इतका नोंदवला गेला.

पाडकाम, बांधकामांवर बंदी

दिल्ली-एनसीआरमध्ये बांधकाम, खाणकाम आणि पाडकामांवर बंदी असेल. दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरमध्ये बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल वाहने चालणार नाहीत. जड वाहतुकीच्या मार्गांवर मशीनच्या माध्यमांतून रस्ते स्वच्छ करण्यात येतील. वाहतुकीच्या आधी रस्त्यांवर पाणी शिंपडण्यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.