जर्मन फॉरवर्ड थॉमस मुलरची निवृत्ती

2014 साली जर्मनीला फुटबॉलचा जगज्जेता बनवणाऱया संघातील प्रमुख फॉरवर्ड असलेल्या थॉमस मुलरने आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला गुडबाय केले आहे. 34 वर्षीय मुलरने जर्मनीसाठी 131 सामने खेळताना 45 गोल ठोकले आहेत. एका यूटय़ूब चॅनलला मुलाखत देताना मुलरने आपल्या भावना व्यक्त केल्या. देशासाठी खेळताना नेहमीच आम्हाला अभिमान वाटला आहे. आम्ही जसा एकत्रित जल्लोष केला आहे तसेच आम्ही ढसाढसा रडलोसुद्धा आहे. मुलरने आपला अखेरचा सामना युरो कपमध्ये स्पेनविरुद्ध खेळला होता. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 2010 साली त्याने अर्जेंटिनाविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय फुटबॉल पदार्पण केले होते. तो आपल्या कारकीर्दीत चार फिफा वर्ल्ड कप आणि तितकेच युरो कप खेळला आहे.