निवृत्त शिक्षिकेची फसवणूक; एकाला पोलिसांनी केली अटक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली निवृत्त शिक्षिकेच्या फसवणूकप्रकरणी शिवम वर्मा याला उत्तर विभाग सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्याने पुरवलेल्या बँक खात्यात फसवणुकीचे पैसे जमा झाले होते.

तक्रारदार निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांनी शेअर ट्रेडिंगबाबत एक जाहिरात पाहिली होती. जाहिरातीनंतर त्यांनी एका लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमधील अॅडमिनने त्यांना शेअर मार्पेटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगितले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक किरण आहेर, वसईकर, सय्यद आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मीरारोड येथून शिवमला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर शिवमने ठगांना बँक खाते पुरवल्याची कबुली दिली. काही महिन्यांपूर्वी शिवमची एकाशी बारमध्ये ओळख झाली होती. ओळखीदरम्यान त्याने शिवमला बँक खाते पुरवल्यास पैसे देऊ असे सांगितले होते. झटपट पैशांसाठी त्याने बँक खाते एका फरार आरोपीला पुरवले होते. खाते पुरवण्याच्या मोबदल्यात त्याला 25 हजार रुपये मिळाले होते. फरार असलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

नफा वाढला पण पैसे काढता येत नव्हते

अधिक नफा देणारे आयपीओ खरेदी करण्यास भाग पाडले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी 23 लाख 69 हजार रुपये गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर त्यांना अॅपवर कोटय़वधी रुपयांचा नफा दिसत होता. त्यामुळे त्यांनी ती रक्कम काढण्याचे ठरवले. मात्र ती रक्कम निघत नव्हती. रकमेबाबत त्यांनी अॅडमिनला विचारणा केली तेव्हा त्यांना आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले.