केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातून (CISF) निवृत्त होणाऱ्या सैनिकांना आता निवृत्तीवेतन आणि इतर लाभ वेळेवर मिळू शकणार आहेत. सीआयएसएफने बुधवारी आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी संबंधित प्रक्रियांना गती देण्यासाठी ई-सर्व्हिस बुक पोर्टल लॉन्च केलं आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, याद्वारे रिअल टाइममध्ये सर्व्हिस बुकवर लक्ष ठेवता येईल. तसेच सेवानिवृत्त सीआयएसएफ सैनिकांना त्यांच्या पेन्शन फाइलची स्थिती रिअल टाइममध्ये कळू शकेल. यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होईल.
पोर्टलच्या माध्यमातून पेन्शन प्रक्रिया जलद केली जाईल, असे सीआयएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ निवृत्तीच्या तारखेलाच मिळू मिळणार. या सुविधेचा फायदा दरवर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातून निवृत्त होणाऱ्या 2400 हून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
दरम्यान, सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके सीआयएसएफच्या विविध कार्यालयांना प्रत्यक्ष पाठवली जातात. यामुळे जास्त वेळ लागतो आणि अनेकवेळा चुकाही होतात. आता याच अडचणींवर मात करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे.