लष्करातील निवृत्तीनंतरही ‘तो’ देशासाठी लढणार, अशोक रगडे यांची शहापुरात जंगी मिरवणूक

शहापूरचा सुपुत्र अशोक रगडे हा देशप्रेमाने भारलेला युवक 17 वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाला आणि प्रदीर्घ कालावधीनंतर तो सेवानिवृत्त झाला. लष्करातील निवृत्तीनंतरही त्याच्यातील जिद्द कायम असून यापुढेही देशासाठी लढण्याचा निर्धार त्याने केला आहे. या निवृत्तीनिमित्त शहापूरवासीयांनी अशोक रगडे यांची जंगी मिरवणूक काढून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अशोक रगडे हे घरची परिस्थिती बेताची असतानाही सैन्य दलात भरती झाले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये त्यांची नेमणूक झाली. पाकिस्तानबरोबर झालेल्या अनेक चकमकींमध्ये त्यांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला. चीनच्या सीमेवरदेखील अशोक रगडे यांनी मोठ्या जिद्दीने आपली ड्युटी बजावली. देशाच्या रक्षणाचे कार्य करत असतानाच हॉकी तसेच बॉक्सिंगमध्येदेखील त्यांनी गोल्ड मेडल मिळवले.

केंद्र सुरू करणार

अतिशय महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय सुरक्षारक्षक दलात (एनएसजी) रगडे यांनी ब्लॅक कॅट कमांडो म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. लष्करातील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होऊन ते आपल्या मायभूमीत म्हणजे शहापूरला परतले तेव्हा आप्तेष्ठ व मित्रमंडळींनी त्यांचे कौतुक केले. तसेच भव्य मिरवणूक काढून अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यामध्ये वडील फुलचंद रगडे व आई प्रमिला हेदेखील मोठ्या अभिमानाने सहभागी झाले होते. निवृत्तीनंतर ते देशसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणार असून येथील तरुणांसाठी सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा अशोक रगडे यांनी केली आहे.