धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात, भावासाठी रितेश देशमुख मैदानात

जे काम करत नाहीत, त्यांना धर्माची गरज पडते. धर्म धोक्यात आहे म्हणणाऱयांचा पक्ष धोक्यात आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही कामाचं सांगा. आमच्या पिकपाण्याला तुम्ही काय भाव देता हे सांगा. आमच्या आईबहिणी सुरक्षित आहेत की नाही ते सांगा. आम्ही अशा भुलथापांना बळी पडणार नाही, असा सणसणीत टोला अभिनेते रितेश देशमुख याने लगावला. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व त्यांचे बंधू धीरज देशमुख यांची प्रचारसभा रितेश देशमुखने गाजवली.

‘तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी’, असे म्हणत रितेश देशमुखने जोरदार भाषण केले. हा जनसागर म्हणजे खरी लीड आहे. महिला मेळाव्यातच विजय निश्चित झाला होता. लय भारी कार्यक्रम धीरजने केला आहे, असेही रितेश देशमुख म्हणाला.

झापूक झुपूक वारं, गुलिगत धोका

गेल्या वर्षी एक लाख मतांची लीड होती. यावेळी इतक्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेचे डिपॉझिट आत्ताच जप्त झाले पाहिजे. लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापूक झुपूक वारं झालेले आहे. पुढे गुलिगत धोका आहे. सावधान रहा. त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आली आहे, असे रितेश म्हणाला.