सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर बंधन येणार

सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना समाजाशी जोडले न जाता स्वतःचे उदात्तीकरण करणे, गैरवापर करणे तसेच सरकारविरोधी कारवायांसाठी केला जाणारा वापर टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना या पुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर बंधने लादण्यात येणार आहेत. याबाबत गुजरात, जम्मू-कश्मीर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमात पुढील तीन महिन्यांत सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात काही सूचना असल्यास संबंधितांनी एक महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडे द्याव्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.