
मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचे चटके संसदेतील वृत्तांकनालाही बसले आहेत. मोदी सरकारने संसद परिसरातील पत्रकारांच्या मुक्त संचारावर निर्बंध लादले आहेत. पत्रकारांनी बाहेर उभारण्यात आलेल्या ‘ग्लासरूम’मधून वृत्तांकन करण्यात यावे, असे फर्मान सोडले आहे. मोदी सरकारच्या या तुघलकी फर्मानामुळे माध्यमात खळबळ उडाली असून प्रेस क्लब ऑफ इंडियाने याचा विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आणीबाणीच्या नावाने गळा काढला होता. त्यानंतर गृहखात्याने आणीबाणी लावली तो दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येणार असल्याची अधिसूचना काढली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळातही माध्यमांवर प्रचंड निर्बंध लावण्यात आले होते. आणीबाणीच्या नावाने खडे फोडणारे मोदी सरकारही त्याच मार्गाने जात आहे.
संसद परिसरातील पत्रकारांच्या मुक्त संचारावर बंधने आणण्यात आली आहेत. यापूर्वी पत्रकार संसद परिसरात मुक्तपणे फिरत असत. वेगवेगळ्या मंत्र्यांना, सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटणे, त्यांच्याकडून बातम्या घेण्याचे काम पत्रकारांना निर्धोकपणे करता येत होते. मात्र आता हे काम संसदेच्या बाहेर बनवण्यात आलेल्या ‘ग्लासरूम’मधूनच करावे लागणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या.
प्रेस क्लब ऑफ इंडियाने या निर्णयाचा विरोध केला आहे. संसदेच्या बाहेर बनवण्यात आलेली ग्लासरूम अतिशय छोटी असून त्यात गर्दी होत असल्यामुळे पत्रकारांना काम करणे कठीण होत असल्याचे प्रेस क्लबने म्हटले आहे. मोदी सरकारने घातलेल्या निर्बंधांची माहिती कळताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकारांची भेट घेतली. पत्रकारांची अडचण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी दिले. लोकशाहीमध्ये पत्रकारांना स्वातंत्र्य असले पाहिजे. पत्रकारांवर बंधने लादण्यात येत असतील तर लोकशाहीचे सौंदर्यच धोक्यात येईल, असेही ते म्हणाले.