वरळी दुग्धशाळा वसाहतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला; डेअरी प्रशासनाचे दुर्लक्ष, गॅलरीचा भाग कोसळल्याने चिंता वाढली

वरळी दुग्धशाळा सरकारी वसाहत इमारतीच्या गॅलरीचा भाग रविवारी सकाळी अचानक कोसळला. या इमारतीमध्ये कोणी राहत नव्हते. सकाळी दहाच्या वेळेत येथे रहदारी असते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारती जीर्ण होत चालल्या असून रहिवाशांनी स्वयंपुनर्विकासाची मागणी केली आहे.

या वसाहतीत एकूण 14 इमारती आहेत. त्यातील इमारत क्रमांक 10 च्या गॅलरीचा भाग पत्त्यासारखा खाली आला. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या इमारतींचे डागडुजीचे काम गेले दोन वर्षे बंद आहे. डेअरी आयुक्तांना पत्र पाठवून येथील इमारतींच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली. तरीही प्रशासनाकडून काणाडोळा केला जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

एसीबीकडे तक्रार

येथील इमारतींच्या डागडुजीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत येथील रहिवासी चंद्रकांत सरगर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे. ही तक्रार लालफितीत अडकल्याचे तूर्त तरी चित्र आहे.

तुम्हीच कामे करून घ्या

या वसाहतीची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) केली जाते. त्यासाठी आमच्या वेतनातून रीतसर पैसे घेतले जातात, मात्र या इमारतींना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्याचा पंप तुम्ही वर्गणी काढून दुरुस्त करा, असे डेअरी प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासनाकडून आम्हाला अशी वागणूक मिळत असल्यास भविष्यात काही दुर्घटना घडली तर त्याला डेअरी प्रशासन, पीडब्ल्यूडी व कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.