दहिसर पार्किंग हबमध्ये स्कूल बस, रिक्षा, गॅरेजसाठी जागा राखीव ठेवा, शिवसेनेची पालिकेकडे मागणी

मुंबईचा एण्ट्री पॉइंट असलेल्या दहिसर जकात नाक्याच्या जागी प्रस्तावित असणाऱ्या पार्किंग हबमध्ये स्कूल बस, रिक्षा आणि गॅरेजसाठी जागा राखीव ठेवा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनीदेखील याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

दहिसर जकात नाका 2017 पासून बंद झाल्यामुळे 18 हजार 603 चौरस मीटर महापालिकेची मालकी असलेल्या मोकळय़ा भूखंडावर पार्किंग हब आणि तारांकित हॉटेल यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने निविदाही प्रसिद्ध केली आहेत. या मोकळय़ा भूखंडावर पार्पिंग हब उभे करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून याआधीच करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेने पालिकेच्या कार्यवाहीचे स्वागतच केले आहे. मात्र या पार्किंग हबमध्ये दहिसर विभागातील खासगी शाळांच्या बसेस व रिक्षा उभ्या करण्यासाठी आणि वाहनांच्या दुरुस्ती करण्यासाठी गॅरेज यांच्यासाठी राखीव जागा ठेवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

…म्हणूनच शिवसेनेची मागणी

दहिसर जकात नाका विभागात अनेक शाळांच्या स्कूल बसची ये-जा असते. मात्र या गाडय़ांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने गाडय़ा रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. शिवाय याच ठिकाणी ड्रायव्हर व क्लिनर गाडय़ा स्वच्छ करणे, दुरुस्ती करणे, जेवण करणे इत्यादी कामे करत असल्याने वाहतुकीस खूपच अडथळा निर्माण होतो. रिक्षांबाबतही हीच स्थिती असते. शिवाय याच परिसरात पोलिसांनी जप्त केलेली वाहने वर्षानुवर्षे उभी असतात. तसेच मुंबईबाहेरून येणाऱया वाहनांची याच ठिकाणी दुरुस्त केली जाते. त्यामुळेही असल्यामुळेही वाहतुकीची समस्या निर्माण होते.