अवघा देश महागाईत होरपळतोय. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेत. जिवनावश्यक वस्तूंचे दर अवाक्याबाहेर गेलेत. गृहिणींच्या किचनचे बजेट अक्षरशः कोलमडून गेले असून जगायचे कसे आणि खायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर असतानाही भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी मात्र महागाई कमी झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे महागाई आणखी कमी करण्याचे ध्येय असून आपल्याला आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सिंगापूरमध्ये फ्युचर ऑफ सायन्स पह्रम 2024 या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी हिंदुस्थानात महागाई आटोक्यात असल्याचे सांगितले. एप्रिल 2022मध्ये देशातील महागाईचा दर सर्वाधिक म्हणजेच 7.8 टक्के इतका होता. आता तो 2 ते 6 टक्के या दरम्यान आहे. परंतु आपले लक्ष्य महागाईचा दर 4 टक्क्यांच्या आत आणण्याचे असल्याचे शक्तिकांत दास म्हणाले. मात्र आधीच महागाईने कळस गाठलेला असताना आरबीआयचे गव्हर्नर नेमके पुठल्या अर्थाने महागाई आणखी कमी करण्याबद्दल बोलत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
महागाईचे आकडे पाहून व्याज दर घटवणार
गेल्या 18 महिन्यांपासून व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यंदाच्या वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आरबीआय व्याज दरात कोणतेही बदल करणार नसल्याचे अर्थतज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना दुसरीकडे भरमसाट व्याज दर भरावे लागणार असल्याने सर्वसामान्यांचे महिन्याच्या खर्चाचे नियोजन कोलमडणार आहे.
गृह कर्ज, वाहन कर्जात दिलासा नाहीच
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जात नसल्यामुळे घराचे स्वप्न पहाणाऱयांना तसेच वाहन कर्ज घेणाऱयांना पुठल्याही प्रकारचा दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. आरबीआयच्या गेल्या अनेक पतधोरण आढावा बैठकांमध्ये व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता पुन्हा व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचे संकेतही दास यांनी दिले आहेत. त्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज घेणाऱयांना या वेळीही दिलासा मिळणार नाहीच हे उघड झाले आहे.