आरक्षण म्हणजे डोकेदुखी, गुजरात मधील भाजपच्या महिला मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

आरक्षण म्हणजे डोकेदुखी आहे असे वादग्रस्त विधान भाजपच्या महिला मंत्र्याने केले आहे. तसेच लांगुनचालन राजकारणामुळे ते हटवता आले नाही असेही त्या म्हणाल्या. गुजरातच्या नौका बेन प्रजापती यांनी हे विधान केले आहे. यावर वाद वाढल्यानंतर त्यांनी माफीही मागितली आहे.

नौकाबेन प्रजापती गुजरात सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त बनासकांठामध्ये प्रजापती या भाषण देत होत्या. तेव्हा प्रजापती म्हणाल्या की आरक्षण हे डोकेदुखी ठरलं आहे. लांगुनचालन आणि व्होट बँकेच्या राजकारणामुळे आपल्याला आरक्षण हटवता आले नाही असेही प्रजापती म्हणाल्या.

आज आपली अर्थव्यवस्था ही जगातली पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? भारताची संपत्ती ही आपली संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्याचे आपले कर्तव्य आहे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरी करून आपली देशभक्ती सिद्ध होणार नाही. आपली देशभक्ती ही आपल्या नसानसांत भिनली पाहिजे असेही प्रजापती म्हणाल्या.

Zee 24 या गुजराती वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार नौकाबेन प्रजापती यांनी माफी मागितली आहे. नौकाबेन प्रजापती म्हणाल्या की, आरक्षणाबद्दल केलेल विधान ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, या भूमिकेचा आणि पक्षाचा संबंध नाही. जर या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते आणि माफी मागते.