विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन एकता आघाडी महाविकास आघाडीसोबत

विधानसभा निवडणुकीत भाजपची भिस्त ही प्रामुख्याने मित्र पक्षांपेक्षा मतविभागणीवर अधिक आहे. यामुळे रिपब्लिक आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये यासाठी छोटय़ा-मोठय़ा आंबेडकरवादी संघटना आणि गटांनी रिपब्लिकन एकता आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपब्लिकन एकता आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरवादी गटांनी एकत्र येत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे दलित संघटनांसोबत झालेल्या एका संयुक्त बैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांनी स्वागत केले आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांशी यापुढील काळात संवाद, संपर्क राखण्यासाठी रिपब्लिकन एकता आघाडीने एक समन्वय समितीही स्थापन केली आहे.

समन्वय समितीमधील सदस्यांसहित रिपब्लिकन एकता आघाडीच्या बैठकीला प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, कॉ. सुबोध मोरे, मिलिंद पखाले (नागपूर), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, भगवान गरुड (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), भागवत कांबळे (रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे), मंगेश पगारे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), शिवाजी गायकवाड, अनिल लगाडे, शशिकांत हिरे, रामानंद पाला हे घटक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील पक्षांशी समन्वयासाठी रिपब्लिकन एकता आघाडीने स्थापन केलेल्या समन्वय समितीमध्ये सुरेश केदारे (दलित पँथर), मिलिंद सुर्वे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), भाऊ निरभवणे (रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे), सागर संसारे (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), रवी गरुड (दलित सेना), मनोज बागूल (रिपब्लिकन जनशक्ती), प्रकाश हिवाळे (लोक मोर्चा), सतीश डोंगरे (आंबेडकरवादी भारत मिशन), बंधुराज लोणे (ज्येष्ठ पत्रकार) यांचा समावेश आहे.