शिवराज्याभिषेकाच्या भित्तिशिल्पाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू

छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे सुंदर भित्तिशिल्प तयार केले आहे. पण देखभालीअभावी या शिल्पाची दुरवस्था झाली आहे. पाच-सहा ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. याबाबतची बातमी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल पालिका अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार महेश सावंत, उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, अजित कदम, चंदू झगडे यांनी महाराजांच्या भित्तिशिल्पाची पाहणी करून पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. शिवसेनेच्या पुढाकाराने भित्तिशिल्पाच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने शिवप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.