रेणुका घोलप यांचे निधन

जव्हार येथील गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत सदाशिव घोलप यांच्या पत्नी रेणुका घोलप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 79 वर्ष होते  त्यांच्या पार्थिवावर जव्हार येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात आले. जव्हार तहसिल कार्यालयामार्फत तसेच जव्हार पोलिसांतर्फे त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जव्हारचे दैनिक ‘सामना’चे प्रतिनिधी चित्रांगण घोलप यांच्या त्या मातोश्री होत. रेणुका घोलप यांचे पती स्वातंत्र्यसैनिक सदाशिव घोलप यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. या संग्रामात त्यांना दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आले होते. जव्हार येथील रुग्णालयात कोणीही गोरगरीब उपचारासाठी दाखल झाल्याचे रेणुका घोलप यांना कळताच त्यांना त्या जेवण, अंथरूण  पांघरूण, कपडे देत रेणुका घोलप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवा केली. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.