हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सूर हरपला

शास्त्रीय, नाटय़ अभंग या तीनही संगीत प्रकारावर विलक्षण हुकमत असलेले, आपल्या भावपूर्ण गायनशैलीने चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देणारे तपस्वी गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांचे ‘प्रिये पाहा’ नाटय़गीत खूप गाजले. या गाण्याने पंडित कारेकर यांना खूप प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळाला. हे नाट्यगीत ऐकल्याशिवाय प्रेक्षक त्यांची मैफल संपवूनच देत नसत. याशिवाय ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘मधु मिलनात या, ‘मर्मबंधातली ठेव ही, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘वक्रतुंड महाकाय’ या आणि अशा त्यांच्या अनेक गाण्यांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले. पंडित कारेकर यांच्या निधनाने शास्त्राrय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

पंडित कारेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. बुधवारी रात्री शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. पंडित कारेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, श्रुती सडोलीकर, रोणू मुजुमदार, मुकुंद मराठे, मुकुंदराज देव, रघुनाथ फडके, राजा काळे, रमण कीर्तने, सतीश व्यास, आदित्य कल्याणपूर, सुरेश बापट आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

कारेकर यांचे गाण्याचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी छोटे-मोठे गाण्याचे कार्यक्रम, मैफली करायला सुरुवात केली होती. ‘प्रिये पाहा’ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका ‘एचएमव्ही’ कंपनीने काढली होती. पुढे त्यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्राrय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार होते. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांत आणि आकाशवाणी संगीत संमेलनांत त्यांनी आपले गायन सादर केले होते. त्यांना आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन सादर करण्याची संधी मिळाली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वादक-कलाकारांबरोबर गायन सादर केले आहे. पंडित कारेकर, अमेरिकेचे ऑर्नेट कोलमन आणि उस्ताद सुलतान खाँ या तिघांनी एकत्रितपणे कार्यक्रम केले. न्यूयॉर्कमधील ‘रागा फेस्टिव्हल’, इटलीमधील ‘अम्ब्रिआ 98’ आंतरराष्ट्रीय महोत्सव यांतील त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले होते.

पंडित कारेकर यांना मध्य प्रदेश शासनाचा ‘तानसेन’ पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, गोमंत विभूषण पुरस्कार, ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

अभिनेते होता होता राहिले…

एका मुलाखतीत आपण अभिनेते होता होता कसे राहून गेलो याविषयी पं. प्रभाकर कारेकर यांनी सांगितले होते. ते म्हणाले, शास्त्राrय गायन, नाटय़संगीत आणि मैफलींमुळे नाव झाल्यानंतर मला ही संधी चालून आली होती. विद्याधर गोखले लिखित ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा झाली. मीही हो म्हटले आणि नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. पण त्याच वेळी केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मला मिळाली. केंद्र शासनाची ती शिष्यवृत्ती मानाची समजली जाते. शिष्यवृत्ती की नाटक यापैकी एकाची निवड मला करायची होती आणि मी शिष्यवृत्ती स्वीकारायचे ठरवले. संगीत नाटक आणि अभिनय सुटला तो सुटला. पुन्हा काही त्याकडे वळलो नाही.

संगीत हाच श्वास आणि ध्यास

पंडित प्रभाकर कारेकर हे मूळचे गोव्याचे. त्यांचे शालेय शिक्षण मडगावच्या नोवेरा हायस्कूल येथे झाले. कारेकर यांच्या घराण्यात गाणे नव्हते किंवा गाण्याचा पिढीजात वारसाही त्यांना लाभला नाही. पण प्रभाकर कारेकर यांचे वडील जनार्दन कारेकर यांना गाण्याची हौस व आवड होती. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. गावातील मंडळीही त्यात सहभागी असायची. भजनाच्या त्या कार्यक्रमात पंडित कारेकरही सहभागी होत असत. पण पुढे गाणे त्यांचा श्वास व ध्यास बनले. पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित सी. आर. व्यास असे गुरू त्यांना लाभले. त्यांची ठुमरीवर चांगली पकड होती.

नाट्यपदे आणि गाणी

‘करितां विचार सांपडलें’, ‘कुटिल हेतू तुझा फसला’, ‘कैसे करूं ध्यान’, ‘गगना गंध आला’, ‘चंद्रिका ही जणु’, ‘जैसी गंगा वाहे तैसे’’, ‘तेचि पुरुष दैवाचे’, ‘दे हाता या शरणागता’, ‘धन्य आनंददिन पूर्ण मम’, ‘धवल लौकिका’, ‘धूलियता पदिं तुझ्या’, ‘नभ मेघांनीं आक्रमिलें’, ‘नभसागरीं उभी बालिका’, ‘प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि’, ‘प्रेमसेवा शरण’, ‘बहुत दिन नच भेटलों’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘भाली चंद्र असे धरिला’, ‘मधु मिलनात या’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘माता वचन दे सदा देशा’, ‘या नव नवल नयनोत्सवा’, ‘रवि मी हा चंद्र कसा’, ‘राधाधर मधुमिलिंद जयजय’, ‘राम होऊनी राम गा.’