रेणापूरमध्ये शेतातून 53 लाख रुपये किमतीचा 358 किलो गांजा जप्त, एकाला घेतले ताब्यात

रेणापूर तालुक्यातील वाला शिवारात एका शेतातून 53 लाख 80 हजार 650 रुपयांचा लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रेणापूर पोलीस ठाण्यांतर्गत वाला शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका शेतातून 358 किलोचा गांजा जप्त करण्यात आला.

परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने वाला शिवारातील प्रेमदास पांडुरंग पवार यांच्या शेतात छापा टाकून गांजाची 358 किलो वजनाची झाडे जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक प्रेमदास पांडुरंग पवार, वय 48 वर्ष, राहणार फरदपूरतांडा, तालुका रेणापूर जिल्हा लातूर. यास अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके ,सुधीर कोळसुरे, नाना भोंग, मोहन सुरवसे, संजय कांबळे, युवराज गिरी, सचिन धारेकर, सिद्धेश्वर जाधव, नितीन कठारे, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, चालक पोलिस अमलदार मुंढे ,पाटील, फोटोग्राफर सुहास जाधव यांचा सहभाग होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास रेणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, मदतनीस पोलिस अमलदार अभिजीत थोरात हे करीत आहेत.