
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात जनतेच्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विरोधकांनी विधानपरिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली आहे. नीलम गोऱ्हे या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या. त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विरोधकांनी केली आहे.
याबाबत विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषेदच्या सभापतींना पत्र लिहिले आहे. उपसभापतींना पदावरुन दूर करण्यासंबंधिच्या प्रस्तावाची सूचना विरोधकांनी सभापतींकडे केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) व म.वि.प. नियम 11 प्रमाणे आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांना उपसभापती या पदावरुन दूर करण्यात यावे, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर अंबादास दानवे, भाई जगताप यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या स्वाक्षरी आहेत.