शनिशिंगणापूर-राहुरी महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात ; सोनईत व्यावसायिकांनी स्वतःच घेतला पुढाकार

जिल्हा मार्ग, राजमार्ग व राष्ट्रीय महामार्ग सोनईमधून जात आहे. या महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते नेवासा व राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अहिल्यानगर यांनी संबंधित व्यावसायिकांना आठ दिवसांची मुदत दिली होती. तशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान, मार्च एण्ड, तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे 29 मार्च रोजी शनिअमावास्या यात्रा, नववर्ष गुढीपाडवा असे जोडून आलेले सण यामुळे शिडौं, शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांच्या गर्दीची शक्यता गृहीत धरून सोनईत अतिक्रमणविरोधी कारवाई लांबणीवर पडणार का? असा प्रश्न निर्माण होत असतानाच येथील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.

शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावरील अतिक्रमणे वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अहिल्यानगर यांनी संबंधित व्यावसायिकांना 12 मार्चला नोटिसा बजावल्या होत्या. राज्य व जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी नेवासा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने यापूर्वीच विविध रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. रस्त्यावरील पक्की-कच्ची बांधकामे हटवली जाणार असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते.

शनिशिंगणापूर-राहुरी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 15 मीटर असे 30 मीटर अंतर निश्चित केल्याने सोनईमधील जवळपास चारशे ते पाचशे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. दुमजली आणि तीन मजली इमारती अतिक्रमणधारक स्वतः ब्रोकर व जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढून घेत आहेत. कारण अतिक्रमण स्वतः न काढल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे. शिवाय जेसीबीला एका तासाला नऊ हजार रुपये भाडे मोजावे लागणार असल्याने, सदरची रक्कम अतिक्रमणधारकांकडून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याने अतिक्रमणे स्वत: काढून घेत आहेत.

जिल्हामार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्न चिघळणार

गेल्या दोन-तीन महिन्यापासून अहिल्यानगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातही अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. सोनईत केवळ नोटीसच दिल्या गेल्या आहेत. शनिशिंगणापूर – राहुरी रस्त्यावरील कधीही कारवाई होईल या भीतीने अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अंतर्गत रस्त्यावर वर्षानुवर्ष राहत असणाऱ्या नागरिकांची घरे कसे काय पडणार असा सवाल उपस्थित झाला आहे. राहुरी-शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा पडणार हे निश्चित, मात्र जिल्हा मार्गावरील अतिक्रमण प्रश्न चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मार्चअखेर आहे. याशिवाय पोलीस बळ उपलब्ध झाल्यास या सर्व बाबीचा तसेच काही अतिक्रमणधारक न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाचा सुधारित आदेश प्राप्त झाल्यास सोनईत अंतर्गत रस्त्यांचे जिल्हा व राजमार्गावरील अतिक्रमणे हटवली जातील.

दुबाले रावसाहेब, उपअभियंता नेवासा साबां