राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी मान्य करीत निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर गुरुवारी रद्द केले. ‘ट्रम्पेट’च्या भाषांतरामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीत तो संभ्रम टाळण्यासाठी ‘ट्रम्पेट’चे भाषांतर रद्द करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवाजी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. मात्र काही मतदारसंघात ‘ट्रम्पेट’ हे चिन्ह अन्य उमेदवारांना देण्यात आले होते. त्या ‘ट्रम्पेट’ चिन्हाच्या मराठी भाषांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विधानसक्षा निवडणुकीत तशा संभ्रमाच्या वातावरणाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ‘ट्रम्पेट’ निवडणूक चिन्हाचे ‘तुतारी’ असे मराठी भाषांतर रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने ही मागणी मान्य केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाचा इतर उमेदवारांनी फायदा उठवला होता.
राष्ट्रवादीचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह कायम
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, ‘ट्रम्पेट’ निवडणूक चिन्हाचा वापर करून विधानसभा निवडणूक लढणाऱया इतर उमेदवारांना देवनागरीत ‘ट्रम्पेट’ असेच लिहावे लागणार आहे. त्यांना ‘ट्रम्पेट’चे ‘तुतारी’ असे मराठी भाषांतर करणे टाळावे लागणार आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या नावापुढे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होणार नाही.