शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय दिना पाटील यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील विजयी झाले. पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा दारुण पराभव केला. मात्र ही निवडणूक रद्द करुन मला विजयी घोषित करा, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका येथील अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांनी दाखल केली होती.
न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एखाद्या उमेदवाराने आपल्याला विजयी घोषित करा, अशी मागणी केल्यास त्या मतदारसंघातील सर्व उमेदवारांना याचिकेत प्रतिवादी करणे बंधनकारक आहे. थोरात यांनी तसे केले नाही. इशान्य मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवणाऱया उमेदवारांना त्यांनी याचिकेत प्रतिवादी केले नाही. त्यामुळे थोरात यांची याचिका फेटाळली जात आहे, असे न्या. मारणे यांनी स्पष्ट केले.
संधी देऊनही प्रतिवादी केले नाही
निवडणूक लढवणाऱया सर्व उमेदवारांना प्रतिवादी करण्याठी थोरात यांनी अर्ज केला होता. त्यास परवानगीही देण्यात आली. मात्र थोरात यांनी सर्व उमेदवारांना प्रतिवादी केले नाही. त्यांच्या अर्जात न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी केली होती. नोटीस जारी करणे म्हणजे संबंधित सर्व प्रतिवादी झाले, असा त्याचा अर्थ होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आईचे नाव न लिहिल्याने आक्षेप
उमेदवारी अर्ज भरताना संजय दिना पाटील यांनी आईचे नाव लिहिले नाही. परिणामी त्यांची खासदारकी रद्द करुन मला विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.