राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मुंबईबाहेर संपूर्ण देशभर फिरण्यासाठी यापूर्वी दिलेली मुभा विशेष न्यायालयाने 17 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवली आहे. अनिल देशमुख यांच्यातर्फे अॅड. इंद्रपाल सिंग यांनी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली.
कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्या जामिनाच्या अटीनुसार मुंबईबाहेर जाण्यासाठी देशमुख यांना न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. न्यायालयाने त्यांना यापूर्वी देशभर प्रवासासाठी परवानगी दिली होती. त्या सवलतीची मुदत वाढवण्यासाठी देशमुख यांनी न्यायालयाला विनंती केली होती.