मराठी खाद्यसंस्कृती जपा! संजय राऊत यांचे आवाहन; डॉ. सोनल मुद्राळे यांच्या ‘सोल फूड’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन

मुंबईतून मराठी माणसाने जपलेली आपली खाद्यसंस्कृती हरवत चालली आहे. मुंबईचे भूमिपुत्र असलेले भंडारी, आगरी, कोळी, पाठारे प्रभू आणि पाचकळशी यांनी आपल्याला खाद्यसंस्कृतीच्या रूपाने जो ठेवा दिलाय तो जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केले. डॉ. सोनल मुद्राळे यांनी पाचकळशी खाद्यसंस्कृतीवर लिहिलेल्या ‘सोल फूड’ या पुस्तक प्रकाशनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्रातील समृद्ध खाद्यसंस्कृतीमध्ये पाचकळशी खाद्यपदार्थांच्या चवीचाही मोठा वाटा आहे. कोळंबीची पाटवडी, कोबीचे भानोले, अननसाची आमटी, भरलेला सारंग अशा पाचकळशी पदार्थांचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. पण हा खाद्य ठेवा आजची तरुण पिढी, हॉटेल व्यवसायातील मंडळीपासून ते खाद्यप्रेमींपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने डॉ. सोनल मुद्राळे यांनी ‘सोल फूड’ हे पुस्तक लिहिले आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये पाचकळशी खाद्यपदार्थांची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच दादरच्या वनिता समाज येथे झाले.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासोबतच शेफ नीलेश लिमये, आमदार अजय चौधरी अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. हॉटेल उद्योगासह खाद्यप्रेमींच्या खाद्य संग्रहात या पुस्तकामुळे मोलाची भर पडणार आहे, असे शेफ लिमये यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले. अगदी परदेश दौऱ्यातही पाचकळशी मसाल्यांपासून बनवलेल्या पदार्थांशिवाय आपले पान कसे हलत नाही याविषयीच्या अनेक खमंग आठवणी आमदार चौधरी यांनी सांगितल्या. यावेळी डिमेलो सर यांनीसुद्धा डॉ. सोनल यांच्याविषयी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

पाचकळशी खाद्यपदार्थांविषयी माहिती पुस्तकरूपात आणावे ही कल्पना आम्हाला कोरोना काळात सुचली. पाचकळशी खाद्य परंपरा जपणाऱ्या माझी आजी, आई यांना हे पुस्तक समर्पित आहे, असे डॉ. मुद्राळे यांनी सांगितले. साटम प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मराठी संपादन आयुषा घागरे हिने केले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी संजय खानविलकर व संजय घागरे यांचे सहकार्य मिळाले आहे.