अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावाबर 22 जुलै 2021 रोजी दरडीच्या रूपाने काळरात्र ओढवली. ग्रामस्थ गाढ झोपेत असतानाच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला. यानंतर तळीयेवासीयांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र साडेतीन वर्षानंतरही तळीयेवासीयांचे पुनर्वसन रखडले आहे. आतापर्यंत केवळ 92 कुटुंबांना घरे मिळाली असून 135 घरांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे हाच का ट्रिपल इंजिन सरकारचा गतिमान कारभार म्हणत तळीयेवासीय संताप व्यक्त करत आहेत,
म्हाडाच्या वतीने 263 सदनिकेच्या बांधकामांस निविदेद्वारे मंजुरी दिली. त्यानंतर कामे सुरू झाली. 271 पैकी 227 घरे बांधली जाणार आहेत. 227 सदनिकांच्या भूखंडापैकी 27 सदनिकांच्या जागेवर कंटेनर ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या 200 सदनिकांचे काम सुरू आहे. 200 पैकी सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात 66, तर दुसऱ्या टप्प्यातील 26 असे एकूण 92 सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे ही कामे लवकर पूर्ण करून आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी तळीयेवासीय करीत आहेत.
44 कुटुंबांचा स्थलांतरास विरोध
तळीये गावच्या एका बाडीतील 44 कुटुंबांनी पुनर्वसन करू नका असा ठराव दिलेला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी भौगोलिक सर्वेक्षण करून निर्णय घेऊ असे म्हटले होते. मात्र अजूनही भौगोलिक सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे त्या गावचे भौगोलिक सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत पुनर्वसन करायचे की नाही, हे स्पष्ट होत नाही आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 227 सदनिकांचे काम सुरू आहे.
● 22 जुलै 2021 रोजी महाडच्या तळीयेसह पोलादपूरच्या केवनाळे आणि सुतारवाडी गावावर दरड कोसळली होती.
● तळीये दरड दुर्घटनेत 84 जणांना आपला जीव गमवला, तर केवनाळे व सुतारवाडी घटनेत 11 जण दरडीखाली गाडले गेले.
● दुर्घटनेनंतर शासनाने तळीयेसह परिसरातील धोकादायक वाडींचा म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.
● यासाठी 17 हेक्टर 38 आर 80 क्षेत्र या जागेवर 271 घरांची पायाभरणी केली. सध्या 200 सदनिकांचे काम सुरू आहे.
● 200 पैकी पहिल्या टप्प्यात 66, तर दुसऱ्या टप्प्यातील 26 अशी 92 घरे तयार. 135 घरांची कामे अजूनही अपूर्ण.