अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मिठागरांच्या जागेवरच, सरकारकडून रहिवाशांची घोर फसवणूक; सरकारने बॅनर्स लावले, रहिवाशी आक्रमक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात मूळ धारावीकरांना धारावीबाहेर काढले जाणार नाही, अशी खोटी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारने आता मुलुंडमधील मिठागरांच्या 58 एकर जागेवर बॅनर्स लावून अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडच्या मिठागरांच्या जमिनीवर केले जाणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजप सरकार आणि भाजप आमदारांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात आधीच मुंबई उच्च न्यायालयात जनहित जाचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, अशी फसवी आश्वासने तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार मिहिर कोटेचा यांनी देऊन मुलुंडकरांची मते घेतली. आमदार मिहिर कोटेचा यांनी तर विधानसभेत मुलुंडमधील एक इंचही जागा दिलेली नाही असा दावा केला आणि त्याचे व्हिडीओसुद्धा स्वतःच व्हायरल केले. मात्र, निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपने हे सर्व हातखंडे आजमावल्याचे आज स्पष्ट झाले.

 भाजप खोटे बोलतोय 

मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन केले जाऊ नये, अशी मागणी मुलुंडकरांनी लावून धरली होती. त्यामुळे घाबरलेल्या भाजपच्या आमदार, खासदार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन केले जाणार नाही, अशी जाहीर आश्वासने दिली. मात्र, दुर्दैवाने मुलुंडकरांनीही त्यावर विश्वास ठेवला. मात्र, मुलुंडकर या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहेत, असे अॅड. सागर देवरे यांनी स्पष्ट केले आहे.

 मुलुंडकरांची 114 एकर जागा अदानी घेणार 

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार धारावीच्या 550 एकर जागेसह मुंबईतील मोक्याचे सुमारे 2 हजार एकरचे 20 भूखंडही अदानी समूहाला देणार आहेत. त्यात मुलुंडमधील केंद्राच्या ताब्यातील मिठागरांची 58 एकरची जागा अदानी समूहाला 319 कोटी रुपयांना दिली आहे. आता मुंबई महापालिकेच्या मालकीची मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची 46 एकर आणि जकात नाक्याची 18 एकरपैकी 10 एकर अशी एकूण 114 एकर जागा अदानी समूहाला देण्यात येणार आहे.