कल्याण-डोंबिवलीत चाललंय तरी काय? न्यायालयाचा आदेश धाब्यावर; बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे रजिस्ट्रेशन सुरूच

भूमाफिया आणि काही बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे रेरा नोंदणी करून कल्याण, डोंबिवलीत शेकडो बेकायदा इमारती उभ्या केल्या आहेत. यातील 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अधिकारी आणि बिल्डरांच्या भ्रष्ट कारभारामुळे 65 इमारतींमधील साडेसहा हजार कुटुंबीय रस्त्यावर येण्याचा धोका असतानाच आणखी गंभीर प्रकरण पुढे आले आहे. 65 मधील साई गॅलेक्सी या अनधिकृत इमारतीतील काही सदनिकांचे रजिस्ट्रेशन झाल्याचा भंडाफोड आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला. याबाबतची लेखी तक्रार कल्याणच्या पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली आहे.

साई गॅलेक्सी इमारत अनधिकृत ठरल्याने पालिकेने तोडण्याची नोटीस बजावली असतानाही तिथे नुकतेच एका सदनिकेचे रजिस्ट्रेशन झाले आहे. न्यायालयाने ती अनधिकृत ठरवल्यानंतरही रजिस्ट्रेशन कसे झाले, हा प्रश्न आहे. नकली पेपर बनवणाऱ्यांची नावे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना दिली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही दीपेश म्हात्रे यांनी केली. यावेळी कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे, राहुल भगत, संजय पाटील, शाम चौगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हा घ्या पुरावा

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीतील बेकायदा इमारतीमधील सदनिकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. २३ जानेवारीला काही अनधिकृत फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन झाल्याचे पुरावेच दीपेश म्हात्रे यांनी पोलिसांना सुपूर्द केले, कल्याण, डोंबिवलीतील रजिस्ट्रेशन ऑफिसमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची लेखी तक्रारही सब-रजिस्ट्रार अधिकाऱ्यांकडे केली जाणारआहे.