वाल्मीक कराडच्या मुलासह साथीदारांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा! सोलापूर न्यायालयात तक्रार; आज होणार सुनावणी

लहान मुलीस मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या सुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली आहे. सुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध महिला, तिचा पती, दोन मुले यांना मारहाण करून ट्रक, कार, दुचाकी, सोन्याचे दागिने लुबाडल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.

सध्या राज्यभर गाजत असलेल्या अट्टल गुन्हेगार वाल्मीक कराड याचा मुलगा सुशील कराड याच्या फर्ममध्ये नोकरीस असलेल्या सोलापुरातील पीडित महिला, तिचा पती, दोन मुले यांना जबर मारहाण करून दोन ट्रक, दोन कार, जागा, सोन्याचे दागिने लुबाडल्याप्रकरणी पीडित महिलेने सुशील कराड व त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही दखल न घेतल्याने जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली. मारहाण करून झालेल्या जखमांचे फोटो, शिवीगाळ केल्याचे फोन रेकॉर्डिंग, पोलीस स्टेशनला वारंवार दिलेले अर्ज, पीडितेच्या लहान मुलीस केलेले मारहाणीबाबतचे पुरावे आज न्यायालयात सादर करण्यात आले.

याप्रकरणी सुशील कराडसह साथीदार अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर उद्या (दि. 21) न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे. यात पीडित महिलेकडून अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. पवार, अॅड. व्हनमाने, तर कराडकडून अॅड. संतोष न्हावकर काम करीत आहेत.