दादरच्या समाधानवाडीतील छोटय़ा दुकानांचा पुनर्विकास 2015 साली झाला खरा, पण या पुनर्विकासानंतर आतापर्यंत तब्बल 9 वर्षे या वृद्ध दिव्यांग व्यक्तीकडून भाडे आकारण्यास एसआरए आणि महापालिका टाळाटाळ करत आहे. त्यामुळे किमान सुविधा देऊ नका पण गाळय़ाचे भाडे तरी घ्या, अशी मागणी या वृद्ध दिव्यांग व्यक्तीने दोन्ही संस्थांकडे केली आहे. दरम्यान, या इमारतीच्या तळमजल्यावर गाळेधारकांसाठी बांधलेल्या शौचालयांची तसेच इतर सुविधांची दुरवस्था झाली असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गाळेधारक आणि त्यांच्याकडे काम करणाऱया कर्मचाऱयांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दादरमधील प्लाझा सिनेमा पाठीमागे भाजी मंडईला लागून असलेल्या समाधानवाडीचा पुनर्विकास होऊन 2015 साली एसआरएने 7 मजली रहिवासी इमारत बांधली, तर उर्वरित भागांत विक्रीसाठी 22 मजली इमारत उभी केली. एसआरए इमारतीखालील 35 जणांना गाळे देण्यात आले. 77 वर्षीय दिव्यांग लक्ष्मण सामंत यांनी आपल्या गाळय़ात आधीप्रमाणे चहाचा व्यवसाय सुरू केला.
गाळय़ाची जबाबदारी नक्की कोणाची?
पुनर्विकासानंतर सामंत आधीप्रमाणे गाळय़ाचे भाडे भरण्यासाठी प्रथम महापालिकेच्या जी-उत्तर विभागात गेले. मात्र, या गाळय़ाचा पुनर्विकास एसआरएने केला आहे. त्यामुळे एसआरएकडे भाडे भरा असे सांगितले. वांद्रे येथील एसआरएकडे गेल्यावर पुनर्विकासाआधी तुम्ही महापालिकेला भाडे भरत होता. त्यामुळे या पुढेही तुम्ही महापालिकेला भाडे भरा, असा सल्ला एसआरएने दिला. गेली 9 वर्षे हेच सुरू आहे, असे सामंत म्हणाले.
…तर न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल!
गेली 9 वर्षे गाळय़ाचे भाडे घेतले गेलेले नाही. त्यामुळे भविष्यात जर एकदम भाडे भरा, असे या दोन्ही संस्थांपैकी एकाने सांगितले तर एवढी रक्कम मला पेलवणार नाही. दंड लावला जाणार तो वेगळा. पुनर्विकासात गाळा मिळाल्याचा आनंद झाला, पण माझ्याकडून ना पालिका भाडे घेत आहे ना एसआरए. त्यामुळे
गाळय़ाचा मालक असूनही त्याचे समाधान मिळत नाही. अखेरचा पर्याय म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशारा सामंत यांनी दिला.