उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गात घट; 33 तासात 31 टक्के पाणीसाठा

सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी रात्री 1लाख 92 हजार क्यूसेक्सने येणारा विसर्ग शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 37 हजार 320 क्युसेक्सपर्यंत खाली आला आहे. 26 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता उजनी धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आले. शनिवारी सायंकाळपर्यंत 33 तासात 31.13% टक्के पाणी तसेच 80.66 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे. 49.05 टीएमसी पाणी 33 तासात धरणात आले आहे.

पुणे व परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी सर्वत्र हलक्या सरी बरसत आहेत. तसेच भीमाशंकरच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. सद्यस्थितीत मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या मुख्य नद्यांच्या पात्रात पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. परंतु उजनीच्या वरील 19 धरणातून अपेक्षित पातळीत पाणी साठा तयार झालेला असल्यामुळे सर्व धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालूच राहणार आहे. बंडगार्डन पुणे येथील विसर्ग 16 हजार 723 क्युसेक्सने चालू आहे. दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग कमी अधिक प्रमाणात यापुढे चालूच राहणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून कळवण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंत जलाशयात 80.66 टीएमसी पाणी साठा झालेला आहे. धरणात मृत पाणीसाठ्यात 31.61 टीएमसी पाणी शिल्लक होते. याचा अर्थ जुलै महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे सध्या 49.05 टीएमसी पाणी आतापर्यंत जलाशयात आले आहे. पूर्ण क्षमतेच्या नियोजनापर्यंत 111 टक्के पाणी व 123 टीएमसी पाणीसाठा होण्यासाठी 80 टक्के पाणी व 43 टीएमसी पाणीसाठा धरणात येणे आवश्यक आहे.

पावसाळ्याच्या उर्वरित अडीच महिन्यांच्या कालावधी पैकी 15 ऑगस्ट ते 20ऑगस्ट च्या दरम्यान ही अपेक्षित पाण्याची पातळी पूर्ण होऊन त्यानंतर मुख्य कालवा बोगद्यातून सीना नदीत व भीमा नदीत धरणातून पाण्याचा विसर्ग सोडावा लागेल. म्हणजेच 15 ते 20 ऑगस्ट पासून पुढे भिमा व सीना नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.