प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी भरती सुरू, 2 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शिक्षक प्रवर्गातील 73 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2 एप्रिल ते 2 मे या दरम्यान केंद्र शासनाच्या ‘समर्थ पोर्टल’ वरून ‘ऑनलाईन’ पध्दतीने अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ जागा मंजूर असून, आजघडीला 130 शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त 159 जागांपैकी 73 पदे भरण्यास राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने 7 ऑगस्ट 2019रोजी मान्यता दिली. सप्टेंबर 2023 मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविण्यात आले. त्यावेळी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाईन तर सुमारे 4 हजार 600 हॉर्डकॉपी जमा झाल्या. तथापि सदर भरती प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेत रद्द करण्यात आली आहे.

सदर पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेरीस मार्चमध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ७३ पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक आठ, सहयोगी प्राध्यापक १२ पदे व सहाय्यक प्राध्यापकांची ५३ पदे भरण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘समर्थ पोर्टल’ तयार केले असून, या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून, २ एप्रिल ते २ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ऑनलाईन अर्जाची प्रत व सर्व कागदपत्रांसह हार्ड कॉपी आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत दाखल करावी, असे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.

संवैधानिक पदाची भरती प्रक्रिया सुरू 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १६ संवैधानिक पदांपैकी केवळ चार पदे पूर्णवेळ भरण्यात आलेली आहेत. रिक्त १२ पैकी १० पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज छाननी पूर्ण झाली. यात सहा संवैधानिक पदे आणि चार अधिष्ठातांचा समावेश आहे. या स्थगित झालेल्या भरती प्रक्रियेस पुन्हा सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कुलसचिव पदासाठी २३ एप्रिल आणि परीक्षा व मूल्यमापन संचालक पदासाठी २ मे रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.