महायुती सरकारने तब्बल 12 माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. छगन भुजबळ, सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण, अब्दूल सत्तार, तानाजी सावंत, दिलीप वळसे पाटील, सुरेश खाडे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे.
जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं म्हणून मंत्रिपद नाकारलं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नांदगावमध्ये छगन भुजबळ यांच्याच आशिर्वादाने पुतण्या समीर भुजबळांनी बंडखोरी केली आणि निवडणूक लढवली. यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात वाद झाला होता असे सांगितले जाते. त्यामुळे भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याचे सांगितले जात होते.
भाजपच्या विजयकुमार गावित यांनी नंदूरबारमध्ये आपल्याच नातेवाईकांना वेगवेगळ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढवायला लावली. पक्ष वाढवण्या ऐवजी आपल्या कुटुबीयांचा दबदबा निर्माण करण्यावर गावित यांनी भर दिला असे सांगितले जाते. त्यामुळे गावित यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. पक्षापेक्षा आपल्या कुटुंबाला महत्त्व दिल्यास काय परिणाम होतात हा संदेश देण्यासाठीही गावित यांचे मंत्रिपद कापण्यात आले.
सत्तार सिल्लोड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघात हिंदूची लोकसंख्या 80 टक्के असून मुस्लिम समुदायाची लोकसंख्या 20 टक्के आहे. असे असले तरी सत्तार यांनी हिंदू जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप झाला. भाजप आणि महायुतीने सत्तार यांचा प्रचारही केला नव्हता. त्यामुळे
उद्या सत्तार निवडून आले तरी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे चित्र निवडणुकीपूर्वीच निर्माम झाले होते.
अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत बैठकीत बसल्यावर उल्टीसारखं होतं असे विधान मिंधे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केले होते. हे विधानच त्यांना भोवल्याचे सांगितले जात आहे. या विधानामुळे अजित पवार गटातील नेते नाराज झाले होते आणि त्यांनी महायुतीला सोडण्याचा इशाराही दिला होता. पण विचारसरणी वेगळी असल्याने आपण असे विधान केल्याचे सावंत यांनी स्पष्टीकरण दिले होते. पण याच विधानामुळे सांवत यांचे मंत्रिपद हुकल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाचे दीपक सावंत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. केसरकरांना महायुतीत शिक्षण मंत्रीपद देण्यात आले होते, त्यात चांगली कामगिरी न केल्याने त्यांच्या मंत्रिपदाला कात्री लावण्यात आली. इतकंच नाही तर राणे आणि केसरकर हे तसे राजकीय शत्रू मानले जातात. लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी राणेंविरोधात काम केले होते, त्यामुळे केसरकरांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.