
कागदपत्रांमध्ये झोलझाल करून कल्याण, डोंबिवलीत भूमाफिया आणि काही बिल्डरांनी बेकायदा इमारती उभारल्याची घटना ताजी असतानाच नेरळच्या विजय गृहप्रकल्पात तब्बल साडेतीनशे ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिल्डरने फसवल्यामुळे अनेकांच्या घरांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. एकीकडे भाड्याचा भुर्दंड आणि दुसरीकडे होम लोनचा हप्ता अशा दुहेरी कोंडीत ग्राहक सापडले आहेत. पदरमोड करून ग्राहकांनी घरासाठी भरलेले ७५ कोटी घशात घालणाऱ्या बिल्डरला नेरळ पोलिसांनी भांडुपमधून बेड्या ठोकल्या.
नेरळजवळील वाकस ग्रामपंचायत हद्दीत विजय हाऊसिंग सोसायटीचे 106 एकरमध्ये गृहप्रकल्प उभारले गेले आहे. येथील इमारतींचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेकांनी या गृहप्रकल्पात गुंतवणूक केली.
साडेतीनशे ग्राहकांनी बँकांमधून कर्ज काढून घर खरेदी केले. 2018 मध्ये घराचा ताबा मिळणार होता. मात्र 2021 उजाडले तरी घराचा ताबा मिळाला नाही. अखेर फसवणूक झालेल्या नागरिकांनी बिल्डर वज्रीलाल गाला याच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
2020 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या गृहप्रकल्पाचे काम त्याचा मुलगा अतीव गाला पाहत होता. अतीव गाला हा भांडुपमध्ये लपून बसल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून अतीवला अटक केली.