देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी प्रभातफेरी, विविध स्पर्धा आणि प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे आयोजन 26 जानेवारी 2025 पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये करावे, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
26 जानेवारीला शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तिपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी.