![Untitled design (22)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-22-696x447.jpg)
गुजरात जायंट्सच्या 202 धावांच्या आव्हानाचाही गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यातच फडशा पाडत महिला प्रीमियर लीगच्या तिसऱया पर्वाच्या उद्घाटनीय सामन्यात खणखणीत विजयी सलामी दिली. 27 चेंडूंत 64 धावांची झंझावाती खेळी करणारी रिचा घोष आरसीबीच्या विजयाची शिल्पकार ठरली.
गुजरात जायंट्सच्यी बेथ मूनी (56) आणि कर्णधार अशले गार्डनरच्या (ना. 79) आक्रमक खेळीच्या जोरावर 5 बाद 201 अशी आव्हानात्मक मजल मारली होती. आरसीबीच्या रेणुका सिंगने 25 धावांत 2 विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली.
जायंट्सच्या 202 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या स्मृती मानधना (9) आणि डेनी वायट-हॉज (4) या सलामीच्या जोडीने घोर निराशा केली. गार्डनरने आपल्या पहिल्याच षटकात पाच चेंडूंत या दोघांची विकेट घेत आरसीबीची 2 बाद 14 अशी बिकट अवस्था केली. मात्र त्यानंतर एलिस पेरी (57) आणि राघवी बिश्त (25) यांनी 86 धावांची भागी रचत आरसीबीच्या विजयाचे आव्हान जिवंत ठेवले. पुढे रिचा घोष आणि कनिका अहुजाने 97 धावांची अभेद्य भागी रचताना जायंट्सच्या गोलंदाजीची यथेच्छ धुलाई करत संघाला नऊ चेंडू आणि सहा विकेट राखून विजय मिळवून दिला. रिचाने आपल्या आक्रमक खेळीत 4 षटकार आणि 7 चौकारांचा वर्षाव करीत रंगतदार सामना एकतर्फी केला.