कर्जदारांचा ईएमआय पुन्हा वाढण्याची शक्यता, उद्यापासून रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची बैठक

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची म्हणजे एमपीसीची 2024 या वर्षातील शेवटची बैठक 4 ते 6 डिसेंबर 2024 यादरम्यान होणार आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सर्वसामान्यांना व्याजाच्या ओझ्यातून दिलासा मिळणार की पुन्हा एकदा कर्जदारांचा ईएमआय वाढणार यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 2024 हे वर्ष सर्वसामान्य आणि कर्जदारांना चांगले गेले नाही. त्यामुळे नव्या वर्षात त्यांना दिलासा मिळेल की नाही, हे या आठवड्यात स्पष्ट होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयने अखेरीस रेपो रेट 25 बेस पॉइंट्सनी वाढवून 6.5 टक्के केला होता आणि तेव्हापासून सलग दहा एमपीसी बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. म्हणजे रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. त्यामुळे कर्जदारांना जोरदार झटका बसलेला आहे. कर्जदारांचा ईएमआय कमी होईल, अशी शक्यता होती, परंतु आरबीआयने अजिबात दिलासा दिलेला नाही.

बैठकीकडे सर्वांच्या नजरा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची पुढील बैठक 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती त्याच दिवशी जाहीर केली जाईल. समितीने सध्याचा रेपो रेट कायम ठेवला तरी कर्जदारांना कुठलाही फायदा होणार नाही आणि रेपो दरात कपात न झाल्याने दिलासा मिळणार नाही.