पुन्हा हिरमोड! ना EMI कमी होणार, ना कर्ज महागणार; RBI कडून सलग अकराव्यांदा रेपो रेट ‘जैसे थे’

महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करून दिलासा देईल असे वाटले होते. मात्र कर्जधारकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सलग 11 व्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षेखालील समितीची बैठक 4 ते 6 डिसेंबर दरम्यान झाली. या बैठकीमध्ये रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी याची माहिती दिली.

शक्तिकांत दास म्हणाले म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने 4-2 अशा बहुमताने रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर महिन्यातील महागाईचा दर वरच्या मर्यादेच्याही पुढे गेला आहे. अन्नधान्य चलनवाढ तिसऱ्या तिमाहीत उच्च राहण्याची आणि चौथ्या तिमाहीत घटण्याची शक्यता आहे. उच्च महागाई दरामुळे सामान्य लोकांच्या हातामध्ये खर्च करण्यासाठी पैसा कमी राहतो. यामुळे परिणाम पैसे खर्च करण्यावर होते, असेही ते म्हणाले.

चालू आर्थिक वर्षामध्ये महागाईचा दर 4.80 टक्के असू शकतो. चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत महागाई दर 5.70 टक्के, तर चौथ्या तिमाहीत तो 4.60 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाईचा दर 4.60 टक्के, तर दुसऱ्या तिमाहीत 4 टक्के असू शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

सीआरआरमध्ये कपात, बँकांचा फायदा

दरम्यान, आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवले असले तरी बँकेच्या सीआरआरमध्ये कपात केली आहे. सीआरआरमध्ये 0.50 टक्के कपात करून तो 4.50 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बँकांना फायदा होणार आहे. या कपातीनंतर जवळपाप 1.16 कोटींची अतिरिक्त रोकड बँक प्रणालीत जमा होणार आहे.