‘रयत’च्या शाळांमधून एआय तंत्रज्ञान शिकवणार

रयत शिक्षण संस्थेचे जाळे महाराष्ट्रभर विणलेले आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आता लवकरच संस्था सर्व शाळांतून एआय तंत्रज्ञान शिकवण्यास सुरुवात करेल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या चिचोंडी पाटील शाखेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 16) कोनशिला अनावरण करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे होते. यावेळी महेंद्र घरत, सतीशकुमार खडके, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, दादाभाऊ कळमकर, मीना जगधने, ज्ञानदेव म्हस्के, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबासाहेब भोस आदी मान्यवर उपस्थित होते.