साहित्य जगत- मराठी नाटय़सृष्टीतील रागरंग

>> रविप्रकाश कुलकर्णी

नाटकाचं जग हे चित्रविचित्र गोष्टींनी भरलेलं असतं. त्याला तुम्ही चित्तचक्षू चमत्कारिक असंदेखील म्हणू शकता. शिवाय इथे रंगभूमीच्या समोर जसं नाटय़ घडत असतं त्याप्रमाणे पडद्याच्या मागेदेखील अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्याची दखल, त्याची नोंद त्या संबंधित लोकांनी घेतलेली असते. त्यात चरित्र, आत्मचरित्र, नाटय़ इतिहास, नाटय़ समीक्षा, नाटय़ अनुभव कथन असे विविध प्रकार येतात. या सगळ्याचा अभ्यास केला असता नाटय़विषयक धारणा तयार होते. याच दृष्टिकोनातून नाटय़ विषयाच्या अभ्यासिका डॉक्टर मेघा सिधये यांनी नाटकासंदर्भात सर्वप्रथम दखल घ्यावी असं 1872 मध्ये प्रकाशित झालेलं का.बा. मराठे कृत ‘नावल व नाटक’ यापासून इसवी सन 2000 मध्ये प्रकाशित झालेले डॉक्टर मधुकर मोकाशी यांच्या ‘दलित रंगभूमी आणि नाटय़ चळवळ’पर्यंत प्रकाशित झालेल्या वीस ठळक पुस्तकांचा मागोवा घेतलेला आहे. या पुस्तकातील हकीकती सांगताना त्या त्याबाबत स्वतची टीकाटिपणी आणि मतं मांडतात. त्यामुळे मराठी रंगभूमीविषयक अभ्यासकांना आणि रसिक वाचकांना हे पुस्तक आपलेसे वाटेल. असे हे संदर्भबहुल पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे.

लोकमान्य टिळक यांचे लेखनिक असलेले आप्पाजी विष्णू कुलकर्णी यांच्या 1903 मधील ‘मराठी रंगभूमी’ या ग्रंथाबद्दल लिहिताना लेखिका या पुस्तकातील प्रस्तावनेत कुलकर्णी यांनी आपला ग्रंथलेखनाचा हेतू नमूद केला आहे. सांप्रत कशा प्रकारची नाटके रंगभूमीवर येत आहेत, मराठी रंगभूमीची एकंदर स्थिती कशी आहे याचे सामान्य स्वरूप वाचकास कळावे, मराठी रंगभूमीवर आलेल्या नाटकांची व नाटक मंडळ्यांची संगतवार हकीगत कळून चांगले कोणते व वाईट कोणते विचार करण्यास लोकांस लावावे हा इतिहास लिहिण्याचा हेतू त्यांनी सांगितला आहे.

मेघा सिधये यांचे ‘मराठी नाटय़ विचार- विविध रूपे’ हे पुस्तक वाचताना हाच अनुभव येतो. त्यांनी विचारार्थ घेतलेली पुस्तके म्हणजे ल.ना. जोशीकृत नटसम्राट… गद्य नाटय़ाचार्य गणपतराव जोशी चरित्र, माझा संगीत व्यासंग…गोविंदराव टेंबे, माझी भूमिका…गणपतराव बोडस, माझा नाटकी संसार भाग एक…भा.वि. वरेकर, माझ्या काही नाटय़स्मृती…पु.गो. काणेकर, नाटक मंडळींच्या बिरहाडी…पुरुषोत्तम रामचंद्र लेले, मखमलीचा पडदा… वसंत शांताराम देसाई, ललित कलेच्या सहवासात… पु. श्री. काळे, मराठी रंगभूमीचा इतिहास… श्री. ना. बनहट्टी, बहुरूपी…चिंतामण गणेश कोल्हटकर, संगीताने गाजलेली रंगभूमी…बाबूराव जोशी, नाटय़विमर्श…के. नारायण काळे, मराठी नाटके माझा छंद…वा. श्री. पुरोहित, स्मृतिधन…नानासाहेब चापेकर, पिंपळगाव ते सुंदर वाडी…त्रिंबक अ. धारणकर, मराठी नाटय़पद स्वरूप व समीक्षा… डॉक्टर अ.द. वेलणकर, वाचिक अभिनय…डॉक्टर श्रीराम लागू, दलित रंगभूमी आणि नाटय़ चळवळ… डॉक्टर मधुकर मोकाशी. ही सगळीच पुस्तकं आता जवळ जवळ अप्राप्य तर आहेतच. शिवाय दुर्मिळदेखील झालेली आहेत पण मेघा सिधये यांनी प्रत्येक पुस्तकातील विशेष साररूपाने मांडल्यामुळे वाचकाला ती मूळ पुस्तके वाचण्याचा मोह नक्कीच होईल.

शिवाय ठीकठिकाणी लेखिकेने त्या पुस्तकांचे वेगळेपण नेमकेपणाने मांडले आहे. उदाहरणार्थ, चिंतामणराव कोल्हटकर यांच्या ‘बहुरूपी’बद्दल त्या लिहितात, ‘चिंतामणरावांच्या या आत्मकथनात भरगच्च अनुभव, हकीकती अन त्यांची सहजसुंदर शैली, शब्दांचा वापर मन मोहवून टाकते.’ त्यात एक आठवण येते की, नाथ माधवांचे लेखक म्हणून नाव झाल्यामुळे त्यांना प्रकाशकाकडून एका पृष्ठाला दोन रुपये मानधन मिळत असे. इतरांना मात्र एक रुपया मानधन होते. नाथ माधवांचे मित्र कृष्णाजी नानाजी अस्नोडकर यांनी एक कादंबरी लिहिली होती. अर्थात मानधन एक रुपया पान, पण प्रकाशक म्हणाला, नाथ माधव नावावर ही कादंबरी छापली तर मात्र दोन रुपये. अस्नोडकरांना पैशांची गरज होती. नाथ माधवदेखील या गोष्टीला तयार झाले. ही कादंबरी पुढे गाजली आणि आजही ती नाथ माधव यांच्याच नावावर आहे. ही कादंबरी म्हणजे ‘डॉक्टर’! (यावरूनच पुढे ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट आला.)

मात्र ही दुरुस्ती परत कधी का झाले नाही हे आश्चर्य! अशा रीतीने ‘मराठी नाटय़ विचार- विविध रूपे’ प्रत्येक वाचकाला काहीतरी देऊन जाईल आणि सुचवेलदेखील.