
>> रविप्रकाश कुलकर्णी
तुझे आहे तुझपाशी, परी जागा चुकलासी… याचे प्रत्यंतर पुन: पुन्हा येत असते. कळते पण वळत नाही हेही अनुभवत असतो. याला काय म्हणायचे माहीत नाही… भले आमची मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड असे आम्ही म्हणत आलो, पण त्याचा रोकडा अनुभव किती पोहोचवला? जणू ती कवीकल्पना आहे असे धरून चाललो. तर कधी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी आमची आम्हालाच समजूत घालत बसलो.
पण अहो आश्चर्यम! केंद्र सरकारने मराठी भाषा अभिजात आहे असे प्रमाणपत्र दिले आणि जणू आमचा आम्हालाच नवा शोध लागला. मुळात आमची मराठी अभिजात आहेच, पण त्याची महत्ता कळायला आम्हालाच वेळ का लागला? अभिजात भाषा दर्जा योजना केंद्र सरकारतर्फे 2004 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम तो सन्मान तामीळ भाषेला मिळाला. त्यानंतर संस्कृत, तेलगू, कन्नड अशा एकामागून एक भाषा अभिजात म्हणून सन्मानित झाल्या.
तोपर्यंत आम्ही मराठी माणसे काय करत होतो? का आम्हाला याचा पत्ताच नव्हता? कारण 2013 मध्ये मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी महाराष्ट्राकडून प्रस्ताव पाठवला गेला. पण मराठीचा आवाज दिल्लीच्या कानावर नेहमीच पडत नाही असे असावे, किंवा तो त्यांच्या कानावर पडायला उशीर होत असावा असा इतिहास आहे. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आमचा संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेला लढा… तो अजून संपलेलाच नाही हे तरी आमच्या लक्षात आहे का? हे घोंगडे अजून अर्धवट भिजत पडलेले आहे! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद केव्हा मिटणार आहे कुणास ठाऊक? या सीमेवरील मराठी लोकांचा आाढाsश आम्हाला महाराष्ट्रात घ्या हा कुणाच्याच कानावर पडत नाही का? निदान आम्ही महाराष्ट्र दिनाला जय जय महाराष्ट्र माझा म्हणताना हे लक्षात ठेवायला नको काय?
राजकारण काय असेल ते असो, पण भाषिक प्रश्न प्रामुख्याने सामोपचाराने मिटवण्याचा मार्ग आहे की नाही? हे म्हणजे जणू याच्यापुढे धर्मराजापुढचा यक्षप्रश्न काहीच नव्हे असे म्हणावे काय? पेच आहे तो हा असा आहे! असो. म्हणजे नसो…
असाच प्रकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या बाबतीत झाला. मराठी भाषा अभिजात आहे हे ढळढळीत सत्य असताना ते आम्हाला सिद्ध करावे लागले. त्याला किती वर्षे लागली? तर 2013 ते 2024! या अभिजात मान्यतेमुळे प्रत्यक्षात आम्हाला केंद्र सरकारकडून किती आणि केव्हा लाभ मिळणार आहे कुणास ठाऊक? पण केवळ घोषणेनेच आम्ही किती मोहरून गेलो!
`अभिजात’ सन्मान, `मराठी’च्या घरा
तोची दिवाळी दसरा
अभिजात दर्जा लाभला,
अवघा महाराष्ट्र आनंदला!!
ही भावना खरीच, पण एवढय़ानेच केवढा बदल होत चाललाय. नॅशनल बुक ट्रस्टचा पुस्तक महोत्सव म्हणजे `न भूतो…’ असाच. न भविष्यती असे मात्र म्हणू नये. कारण मनात आणले तर नॅशनल बुक ट्रस्ट काय करू शकते हे दिसून आले. हाच दृष्टिकोन त्यांनी जपला पाहिजे. कायम ठेवला पाहिजे… त्यानंतर झाले विश्व मराठी संमेलन, त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा झेंडा `सरहद’ या संस्थेने चक्क दिल्लीत फडकवला.
27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने महाराष्ट्रात इतके विविध सांस्कृतिक कार्पाम झाले की, त्यात सहभाग घेताना तारांबळ उडाली… हा उत्साह अवर्णनीय असाच होता.
साहित्य संमेलनाची `जरीपटका’ ही स्मरणिका निघाली आहे. त्यातील संपादकीयात श्रीराम पवार म्हणतात, “काही हजार वर्षे जी भाषा कालसापेक्षता टिकवत वापरात राहिली तिच्या भविष्याविषयी अगदीच काळजी करावी असे काही नाही. पण काळाचे म्हणून काही मुद्दे भाषेसमोर येत असतात. आजच्या काळाचे असे काही प्रश्न जरूर आहेत. ज्याला उत्सवी मराठी प्रेमापलीकडे जाऊन भिडावे लागेल. जगरहाटीत अर्थव्यवहाराला आलेले महत्त्व पाहता मराठीच नव्हे, तर साऱयाच भारतीय भाषांची अर्थव्यवहारात कशी सांगड घालता येईल, हा आता मुद्दा असेल. सांस्कृतिक सपाटीकरण ठोसपणे होत असताना आपापल्या भाषांची आणि त्यातून प्रकटणाऱया सांस्कृतिक ताण्याबाण्याची जपणूक हा साहित्य व्यासपीठावर चर्चेचा मुद्दा असायलाच हवा.” थोडक्यात सांगायचे झाले तर, महाराष्ट्र धर्म पुन: पुन्हा जागवायचा असेल तर श्रीराम पवार यांचा हा दृष्टिकोन होकायंत्रासारखा दिशादर्शक ठरावा.
सध्याचे मराठीविषयक उपाम चाललेत ते पाहता ते केवळ उत्साही वा उत्सवी राहू नयेत याची काळजी घ्यायला पाहिजे. असे म्हणतात की, सोडा वॉटरची बाटली जेवढय़ा उत्साहात उघडली जाते तेवढा सोडा उंचावर उडतो. मात्र हा जोश संपला की संपतोच. मराठी उत्सवाला आणि उत्साहाला ही कुणाची नजर लागू नये असेच वाटते.