>> रविप्रकाश कुलकर्णी
ही वक्त्यांना श्रोते वश असतात. त्यामुळे ते श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवू शकतात. पण मला एक माणूस माहीत आहे, ज्याच्या शब्दाखातर लोक लाख-लाख रुपये विनाअट सहजपणे देतातच. शिवाय म्हणतात, आणखी लागले तर देतो, फक्त सांगा. याचे कारण देणाऱ्यांना नक्की माहीत असते की हे पैसे हा माणूस स्वतच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घेत नसून कुठल्या तरी सत्कार्यातच उपयोग करणार आहे. मग हे कार्य कधी दुखितांचे अश्रू पुसण्याचे असते तर कधी गुणीजनांची कदर करणारे. ज्यांची दखल कोणीच घेतली नाही, त्यांची कदर करणारे आणि त्या गुणीजनाला ते ‘माझा पुरस्कार’ म्हणून ट्रॉफी देऊन गौरव करतात. याच्या जोडीला या माणसाची बेबाक कॉमेंट्री चाललेली असते. त्यांना आर्थिक सहाय्य करणाऱयाबद्दल ते म्हणणार, ‘माझ्या खिशात दमडी नाही, पण लाख लाख रुपये देणारे माझ्या खिशात आहेत!’ हे सगळे नीरस वाटेल म्हणून की काय, ते समारंभामध्ये नाचगाणी, ऑर्केस्ट्रा वगैरे वगैरे ठेवणार. असा हा गंगाजमनी कार्यक्रम श्रोतेदेखील एन्जॉय करतात.
या सगळ्याचा कर्ता धर्ता आता निदान नाटय़सृष्टीतील लोकांना नक्कीच माहीत आहे त्याचे नाव अशोक मुळ्ये. उत्साह तर इतका अमाप की या माणसाचे वय 81 आहे यावर विश्वास बसू नये. एरवी असे तोंडदेखले बोलायचे असते. पण मुळ्ये यांच्याबाबतीत ही वस्तुस्थिती आहे. वर्षानुवर्षे हे चाललेले आहे. ना कधी मुळ्ये बदलले ना कधी प्रेक्षक कंटाळले. त्यामुळे अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ची लोक वाट पाहत असतात…
2024 वर्ष संपता संपता त्यांचा कार्यक्रम होता, -शंभराव्या नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मुंबईकर रसिकांसाठी एक रसिला कार्यक्रम एक सांस्कृतिक जल्लोष! आता मुळ्यांचा कार्यक्रम म्हटला की गाणी बजावणी आलीच. पण या वेळचे वेगळेपण म्हणजे विचारवंत शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार. आता माशेलकर यांचा सत्कार ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. त्यांचे कर्तृत्व आणि कामगिरी एवआहे की त्यांचे सत्कार करावे तेवकमीच… पण मुळ्ये यांनी माशेलकरांचा सत्कार करण्याचे निमित्त केले. एकूण 51 डॉक्टरेट पदव्या मिळवलेले विचारवंत-शास्त्रज्ञ श्री. रघुनाथ माशेलकर यांना ‘माझा डॉक्टरेट पुरस्कार प्रदान सोहळा.’
आता माशेलकर यांना जरी डॉक्टरेटचे अप्रूप नसले तरी हा एक विक्रम आहे. या अगोदरचा विक्रम म्हणजे एपीजे अब्दुल कलाम यांना 48 मानद डॉक्टरेट मिळाल्या होत्या. त्यामुळे माशेलकरांचा सन्मान करण्याचे कोणाला सुचले नाही, ते अशोक मुळ्ये यांना सुचले हे त्यांचे मार्मिकपण. त्यात पुन्हा ‘माझा डॉक्टरेट पुरस्कार’ हे शब्द योजण्यात त्यांचे शब्दचातुर्यदेखील लक्षात येते. अर्थात हे त्यांच्याकडे पुरेपूर आहेच.
असे जरी असले तरी माशेलकरांची यावर काय प्रतिक्रिया असेल? त्यांच्याबद्दल सद्भाव असलेल्या आणि जणू त्यांच्या घरचेच असलेल्या न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांना माशेलकरांकडे ‘शब्द’ टाकायला सांगितले. पण धर्माधिकारी यांनादेखील संकोच वाटला असावा. त्यांनी मुळ्ये यांच्या संदर्भातील सगळी माहिती माशेलकरांकडे पाठवून दिली. अर्थात माशेलकर कार्यक्रमाला आले. सत्कार स्वीकारला. एवच नव्हे तर आपल्या भाषणात सुरुवातीलाच ते म्हणाले, ‘मुळ्ये हे एक विद्यापीठ आहे. त्यांनी दिलेली डॉक्टरेट ही 52 वी आहे. हा माझा मी सर्वोच्च सन्मान समजतो.’
माशेलकरांसारखा मोठा माणूस सर्वसामान्यांनादेखील आपलासा वाटतो त्याचे कारण हे असे आहे. माशेलकर यांची जडणघडण प्रतिकूल परिस्थितीत कशी झाली हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र त्या परिस्थितीवर मात केली ती आईचा शिक, अधिक शिक असा धोषा लावल्यामुळे हे त्यांनी पुनः पुन्हा सांगितले. पुम्हणाले, आई नेहमी म्हणायची की आपली मुळं कधीही विसरायची नाहीत. हे मी कायम लक्षात ठेवले.
माशेलकरांनी आणखी एक आठवण सांगितली. एकदा विद्वतजनाच्या मेळाव्यात जग बदलणारी समीकरणे कोणती अशी चर्चा सुरू होती. आइन्स्टाईनच्याe=mc2 सारख्या समीकरणांची उदाहरणे पुन्हा आली. मी गप्पच होतो. मला विचारल्यावर म्हटलं या सगळ्या समीकरणापेक्षा माझं समीकरण आहे e=f याचा अर्थ शिक्षणामुळेच भविष्य घडते व त्याचा पुरावा म्हणजे मी तुमच्या पुउभा आहे. माशेलकरांनी हळद आणि बासमती तांदळाच्या स्वामित्व हक्कासाठी बलाय़ अमेरिकेशी दिलेला लआणि त्यात मिळवलेला विजय, गरीबांसाठी तंत्रज्ञानासाठी धडपडणाऱया मुलांसाठी स्वस्त उपलब्ध शिष्ययोजना अशा गोष्टी मुद्देसूदपणे सांगितल्या आणि या सर्वांमध्ये आईची शिकवण मला कायम प्रेरणादायी आहे हे पुनः पुन्हा सांगितले.
तसे पदवीदान समारंभ मी अनेक पाहिले आहेत. सगळ्यांचा चेहरा मोहरा कमीजास्त सारखाच. पण हा काही जगावेगळाच. त्यात पुन्हा माशेलकरांचे समीकरण ठसले. शिक्षणामुळेच भविष्य घडते!