>> रविप्रकाश कुलकर्णी
कॅलेंडर, दिनदर्शिका म्हणजे कागदाच्या दर्शनी भागात वार, दिनांक पाहण्याची सोय. वर्षानुवर्षे चालत आलेली ही कल्पना ‘कालनिर्णय’ने बदलून टाकली. कॅलेंडरच्या दर्शनी भागाबरोबरच त्याची मागची बाजूदेखील पाहायची, वाचायची सवय ‘कालनिर्णय’ने लावली. या वळणावरच ‘साहित्य वैभव’ दिनदर्शिका आली. मराठीतील दिवंगत नामवंत साहित्यिकांचा उत्कृष्ट कृष्णधवल फोटो. त्याखाली दोन महिन्यांच्या तारखा आणि त्या पानाच्या मागे त्या लेखकाच्या जन्म-मृत्यू या तारखा देऊन नेमकी वाङ्मयीन कामगिरी नोंदवायची असे त्याचे स्वरूप ठरले, पण कॅलेंडरवरील माहितीचे आयुष्य वर्षभर असल्यामुळे या माहितीचे आणि फोटोंचे पुस्तक काढायचे ठरले व ते म्हणजेच ‘साहित्य नक्षत्रे.’ लेखक, संपादक डॉ. मेधा सिधये यांनी.
काशीबाई कानिटकर ते सुधीर मोघे अशा 27 साहित्यिकांची तोंडओळख येथे करून दिलेली आहे. यानिमित्ताने सांगायचे आहे ते यातील लेखकांच्या फोटोबद्दल. किंबहुना ‘साहित्य वैभव’ दिनदर्शिकेचे दर्शनी सर्वप्रथम आकर्षण फोटोच हे आहेत. एकूणच मराठी संस्कृतीत फोटोबद्दल पूर्वी तरी अनास्थाच होती. फोटो काढला की, आयुष्य कमी होते अशा चुकीच्या कल्पना असल्यापासून ते या माध्यमाची महागडी किंमत अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या लेखकांचे चांगले फोटो मिळणे ही अवघडच गोष्ट होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थांनी काही साहित्यिकांचे फोटो फ्रेम करून जपून ठेवले म्हणून निदान ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही फोटोंचा समावेश या पुस्तकात आहे, पण हे फोटो कोणी काढलेत याची नोंद नसावी.
मात्र ज्यांनी कोणी हे काढलेत, त्यांना मात्र इथे श्रेय दिलेले दिसते. एवढेच नव्हे तर त्यांचा कॉपीराईट आहे हे नमूद केलेले आहे. यातील दोन फोटोंबाबत मात्र असमाधान व्यक्त करतो. एक फोटो आहे बालकवींचा. तो फोटो नसून खरे तर फोटोवरून ल. म. कडू यांनी रिड केलेले चित्र आहे.
या पुस्तकात ज्यांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे सार्थपणे म्हटले जाते, त्या केशवसुतांचा फोटो नसून ल. म. कडू यांनी केलेले चित्र आहे. मुळात केशवसुतांचे छायाचित्रच उपलब्ध नाही. (जन्म मालगुंड येथे 7 ऑक्टोबर 1866. मृत्यू 7 नोव्हेंबर 1905 हुबळी येथे.) त्यांच्या निधनानंतर एका तपाने त्यांचा कवितासंग्रह हरिभाऊ आपटे यांनी प्रकाशित केला. अशा प्रसिद्धिपरांङ्मुख कवीचे छायाचित्र नसावे याची रुखरुख केशवसुतांच्या अनेक चाहत्यांना लागून राहिली होती. त्यातलेच एक मुंबईचे सुंदरराव वैद्य होते. त्यांचा अतिंद्रिय शक्तीचा अभ्यास होता. एके दिवशी चर्नी रोड येथील स्मशानात चित्रकलेचे सर्व साहित्य घेऊन गेले. आपल्याला केशवसुतांचे चित्र काढायचे आहे म्हणून त्यांनी अतिंद्रिय शक्तींना आवाहन केले. त्या बाधित अवस्थेत त्यांच्याकडून जे चित्र काढले गेले ते केशवसुतांचे होते!
हे चित्र सर्वप्रथम पुण्याच्या कवी अज्ञातवासी (दि. ग. केळकर… राजा केळकर संग्रहालयाचे सर्वेसर्वा) यांच्या ‘सरस्वती’ मासिकात छापले गेले. पुढे कित्येक वर्षे हे चित्र प्रचलित होते. केशवसुतांची जन्मशताब्दी झाली तेव्हा या चित्रावरूनच चित्रकार एम.आर. यांनी अधिक देखणे आणि सौष्ठवपूर्ण चित्र तयार केले. तेच आता बहुतेक ठिकाणी केशवसुतांचे चित्र म्हणून लावले जाते. पुढे या चित्रावरून काहींनी चित्र काढले. गोव्याच्या सोमनाथ कोमारपंत यांनीदेखील त्यावरून चित्र रेखाटले आहे. फरक एवढाच की, केशवसुतांना ‘दुर्मुखलेला कवी’ अशी दूषणे दिली गेली हे लक्षात ठेवून कोमारपंतांनी रेखाटलेल्या चित्रात केशवसुतांच्या चेहऱयावर हलकेसे स्मित आहे! ‘साहित्य नक्षत्रे’मध्ये ल. म. कडू यांनी केशवसुतांचे जे चित्र रेखाटले आहे ते एम.आर. आचरेकरांच्या चित्रावरून केलेले दिसते.
तेव्हा केशवसुतांच्या चित्राचे पहिले श्रेय सुंदरराव वैद्य यांना द्यायलाच हवे. जमेल तशी या चित्राची हकीकतदेखील सांगायला हवी. खरे तर यावर कोणीतरी आता संशोधन करून लिहायला हवे.
डॉ. मेधा सिधये यांच्या ‘साहित्य नक्षत्रे’ या पुस्तकामधील नव्या-जुन्या 27 साहित्यिकांबद्दल, त्यातील लेखाबद्दल बोलले जाईल, लिहिले जाईल. त्या तुलनेत फोटोबद्दल फारसे लिहिले जाणार नाही. कारण आपली शब्दबहुल संस्कृती. हे लक्षात घेऊन यातील चित्रांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.