गणपती आले अन् रवींद्र चव्हाण दिसू लागले; चाकरमान्यांची दिशाभूल करण्यासाठी बैठकांची नौटंकी सुरू

मुंबई-गोवा महार्मागाची अक्षरशः वाताहत झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महामार्गाची पाहणी करण्यासाठी या दोन महिन्यांत एकदाही फिरकले नव्हते. मात्र आता गणेशोत्सव तोंडावर आल्याने चाकरमान्यांचा रोष कमी करण्यासाठी रवींद्र चव्हाण अचानक महामार्गाच्या पाहणीसाठी दिसू लागले आहेत. चाकरमान्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बैठकांची नौटंकी सुरू केली आहे. गेल्या वर्षीही असाच बैठकांचा फार्स केला होता. तरीही खड्ड्यांतूनच प्रवास करत गणेशभक्तांना कोकणात जावे लागले होते. त्यामुळे – बांधकाम मंत्र्यांनी बैठका घेण्याचे नाटक करण्यापेक्षा खड्डेमुक्त महामार्ग करण्याची हमी द्यावी, अशी आक्रमक मागणी गणेशभक्तांनी केली आहे.

जूनच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. महामार्गाची दुरवस्था झाल्याने अपघात वाढले आहेत. खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन गेल्या दोन महिन्यांत एकदाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महामार्गाच्या पाहणीसाठी आले नव्हते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर त्यांचे दर्शन होत आहे.

चव्हाणांनी पळ काढला

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज पेण येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न विचारताच कोणतेही उत्तर न देता त्यांनी अक्षरशः पळ काढला. यामुळे शेकडो प्रवाशांचा बळी घेणाऱ्या खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गाबाबत मंत्री एवढे बेजबाबदार कसे असू शकतात, असा संताप प्रवासी व्यक्त करत आहेत.

गेल्या वर्षीचे आश्वासन हवेत विरले

गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावसाळ्यात महामार्ग पाहणीसाठी आठ दौरे केले होते. या दौऱ्यात त्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका लेनचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले होते. आताही केवळ नौटंकी करण्यासाठी आताही रवींद्र चव्हाण दौरे करत आहेत. गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. तरीही अद्याप एका लेनचे काम पूर्ण झाले नाही. खड्डेही भरले नाहीत.