अश्विनच्या हातात गुलाबी चेंडूही नसणार

हिंदुस्थानसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रविचंद्रन अश्विनच्या हातात गुलाबी चेंडूही नसणार याचे संकेत मिळू लागले आहेत. एवढेच नव्हे तर, पुढील तिन्ही कसोटींतही त्याच्या फिरकीला ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे अंदाज दिग्गज क्रिकेटपटू वर्तवत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी खेळपट्टीवर फिरकीचा बादशहा असलेल्या अश्विनवर संघात असूनही बाकावर बसण्याची नामुष्की झेलावी लागणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पुणे कसोटीत अचानक वॉशिंग्टन सुंदरची एण्ट्री झाल्यामुळे अश्विन संघाबाहेर पडला आहे. कानपूर कसोटीनंतर अश्विनला पुणे आणि मुंबई कसोटीत संघात स्थान मिळाले नव्हते. त्याच्या जागी संघात अचानक आलेला सुंदर सलग चौथी कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना पोषक असल्यामुळे एक किंवा दोन फिरकीवीरच संघात खेळू शकतात.