साहित्य जगत : परममित्रचे माधव जोशी

>>रविप्रकाश कुलकर्णी

कुठलाही गाजावाजा न करता स्वतचे एक निश्चित धोरण ठेवून पुस्तके प्रकाशित करणारी जी काही थोडी माणसे मराठी प्रकाशन व्यवसायात आहेत, त्यापैकी ‘परममित्र’ प्रकाशनचे माधव जोशी हे एक! अशा या उमद्या प्रकाशकाचे 12 जून 2024 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. ही वार्ता ऐकून अनेकांचे हृदय हलले याचे कारण व्यवहाराच्या पलीकडे त्यांचे असणारे माणूसपण!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत त्यांची जडणघडण झाली. सुरुवातीला ‘तरुण भारत’मध्ये आणि नंतर ग्रंथालीमध्ये प्रकाशन व्यवसायाचे त्यांनी धडे गिरवले. विशेष म्हणजे त्या गोतावळ्यात न अडकता त्यांनी स्वतचे प्रकाशन सुरू केले. सुरुवातीला आधी त्यांनी ‘आपला परममित्र’ हे त्रैमासिक सुरू केले. पुढे या त्रैमासिकाचे रूपांतर द्वैमासिकात केले. या यशाने आत्मविश्वास येऊन जोशी यांनी प्रकाशन व्यवसायात उडी घेतली. यात त्यांचे वेगळेपण म्हणजे परममित्र पब्लिकेशनचे पहिले प्रकाशन ‘प्रिय भीमास’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण सांगणारा कवितासंग्रह ज्याचे संपादन अरुण म्हात्रे यांनी केलेले होते. या सुमाराची एक आठवण सांगायला हवी. यश मिळाले की बऱयाचदा लेखकाचा ‘लेखकराव’ होतो. तसेच संपादकाचा ‘संपादक साहेब’ होतो. तसे एका लेखकाने माधव जोशींना ‘माधवराव’ म्हटले तर दुसऱया लेखकाने ‘जोशी साहेब’ म्हटले. तेव्हा त्यांना अडवत माधव जोशी म्हणाले, “मला ‘माधवराव’ म्हणायचे नाही किंवा ‘जोशी साहेब’, ‘जोशी बुवा’ न म्हणता ‘माधव जोशी’ असंच म्हणायचं.’’

माधव जोशींचे हे वेगळपण शेवटपर्यंत टिकले हे विशेष. ‘परममित्र’मध्ये विविध विषय आणि समृद्ध आशय देण्याचा कटाक्ष ठेवल्यामुळे वेगवेगळे लेखक त्यांना मिळत गेले. काही संपादक जोशी यांनी शोधले. त्यामधलेच एक म्हणजे, जो आधी विज्ञानविषयक लेख लिहीत होता, त्याची पुस्तकेदेखील झाली होती, पण लेखकाशी चर्चा करताना जोशी यांच्या लक्षात आले की, हा लेखक गुप्तहेर संघटना, देशी-परदेशी राजकारण यांचा उत्तम धांडोळा घेऊ शकतो. त्यातून त्याचे पहिले पुस्तक आले ‘रशियाचे के.जी.बी.’ रशियाच्या पोलादी पडद्यापलीकडचे विलक्षण थरारक अनुभव यामध्ये आल्याने वाचकांच्या त्यावर उडय़ा पडल्या. जणू एका रात्रीत म्हणतात तसा हा लेखक माहीत झाला. हा लेखक म्हणजे पंकज कालुवाला! त्यानंतर या लेखकाची ‘अमेरिकेची सीआयए’, ‘ब्रिटिश गुप्तहेर संघटना’, ‘जर्मन गुप्तहेर यंत्रणा’, अशी एकापेक्षा एक सखोल आणि समृद्ध पुस्तके येत गेली. ‘इस्त्रायलची मोसाद’ हे जवळ जवळ सातशे पानांचे पुस्तक तर अनेकांना प्रेरणादायक वाटले. त्याच्या आवृत्तीच्या आवृत्त्या निघाल्या यात आश्चर्य नाही, पण त्यावरून इतरांनी या विषयावर त्यांची पुस्तके बेतली.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर या इमारतीत तळमजल्यावर सुधीर नांदगावकर यांचे ऑफिस होते. तेथे रघुकुल, प्रकाश भातंब्रेकर, विनय नेवाळकर अशी वेगवेगळी माणसे जमत असत. अर्थात गप्पांचा फड सुरू होई. नाना विषय निघत. अर्थात तेथेच ‘कालनिर्णय’चे ऑफिस असल्यामुळे त्यांच्या कामाच्या रगाडय़ातून बदल म्हणून या बौद्धिक अड्डय़ावर जयराज साळगावकर हजेरी लावत. अर्थात तेथे माधव जोशीदेखील असत. रघुकुलच्या चित्रपटविषयक गप्पा ऐकून माधव जोशींनी त्यांना लिहिते केले. त्यातूनच त्यांची ‘चेहरे’, ‘खलनायक’, ‘लोलक’ अशी नामांकित पुस्तके आली. जयराज साळगावकर यांचे पहिल्या बाजीरावाबद्दलचे पुस्तक ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ आले. देविदास पोटे यांचे संतसाहित्याचा धांडोळा घेणारे लेखन, दीपक घारे यांचे ‘मुद्रणपर्व’ हे पुस्तक मुद्रणाकडे सौंदर्यदृष्टीने कसे पाहावे सांगणारे पुस्तक हेही त्यातीलच.

‘परममित्र’च्या अशा अनेक पुस्तकांच्या कथा सांगता येतील. अलीकडेच त्यांनी शोधलेला लेखक म्हणजे नीलेश ओक. खगोलशास्त्राच्या अनुमानाने त्यांनी रामायण आणि महाभारत यांची निश्चित कालगणना सिद्ध केलेली आहे. त्यांच्या इंग्रजी ग्रंथाचे मराठी भाषांतर ‘परममित्र’ने मराठीत उपलब्ध करून दिलेले आहे. ‘परममित्र’चा लोगोला जोडून शब्द येतात…

जिथे आहे बा ग्रंथ क्षेत्र, तेथे भेटती ‘परममित्र’
तैसा आनंद अन्यत्र लाभेना कुठे
हे शब्द सार्थ ठरवण्याचाच प्रयत्न माधव जोशी यांनी केला. त्यांना विनम्र श्रद्धांजली!