>> रविप्रकाश कुलकर्णी
सर्व समान आहेत, भेदाभेद अमंगळ, हा कंठशोष प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे माझ्या कानावर येत असतो, पण वास्तवात काय दिसतं? जात नाही ती जात. त्याचा रोकडा अनुभव कळत नकळत दिसतो वा जाणवतो.
‘तुमची जात कोणती?’ या नावाचे पुस्तक आले आहे. लेखक सुनील पांडे. प्रकाशक स्नेहवर्धन प्रकाशन. सरकारी पाहणीत जात हा मुद्दा तर अपरिहार्यच. त्यालाच सर्वेक्षण असं गोंडस नाव आहे. अशा सरकारी सर्वेक्षणाची डायरी-नोंद म्हणजे ‘तुमची जात कोणती?’ हे पुस्तक आहे. अर्थात कुतूहल वाढवणारे हे पुस्तक असणार यात शंकाच नाही.
जात ही गोष्ट आमच्या हाडामांसी कळत नकळत इतकी मुरलेली आहे की, ती जातीय वळणाकडे कशी वळेल हेदेखील सांगता येत नाही. हे सगळे पुन्हा एकदा आठवायचं कारण शरणकुमार लिंबाळे यांचा ताजा कवितासंग्रह. त्याचे नावच मुळी आहे, ‘तुमची जात काय?’ प्रकाशक आहेत दिलीपराज प्रकाशन.
“तुमची जात काय?’ त्याने प्रश्न केला
अन् मी हादरून गेलो,
अंगावर अॅसिड फेकल्यागत झालं
गडबडून गेलो, काही सुचेना
काय सांगावं, कसं सांगावं, कळेना
उघडं पडण्याची मला भीती वाटत होती…’’
असे शरणकुमार लिंबाळे म्हणतात तेव्हाच स्पष्ट होते, विचारणारा कोण आहे आणि कुणाला विचारले आहे. म्हणूनच की काय, लिंबाळे कवितेत पुढे म्हणतात,
“खालच्या जातीचे आपली जात सांगत नाहीत,
जात लपवून ठेवतात
वरच्या जातीचे आपली जात सांगतात
त्यांना जातीचा अभिमान वाटतो
तुम्ही खालच्या जातीचे तर नाही
त्यांनी माझी चोरी पकडली होती
मी जात लपवून ठेवली होती
मला माझ्या जातीची लाज वाटली होती
कोणी जात विचारण्याअगोदरच मी सावध होतो
जात विचारणाऱयापासून दूर जातो’’
हे वाचल्यानंतर अर्थातच विचारचक्र सुरू होते की, खालची जात आणि वरची जात हे ठरवले कोणी? त्याचा गडद पगडा अजूनही का पुसला जात नाही? त्याचं कारण जात वास्तव आम्ही विसरायला तयार नाही. मग तो खालच्या जातीचा असो वा वरच्या जातीचा. या अस्वस्थतेतून शरणकुमार प्रश्न करतात…
“कसं रचलं हे भेदभावाचं तत्त्वज्ञान
मी महान तू लहान
कसं सुचलं हे तुम्हाला कोणत्या कारणाने
मी उच्च तू नीच’’
ही विषमता लिंबाळे यांना ठायी ठायी जाणवत राहते. त्यातून ते म्हणतात,
“महान संस्कृती रे तुमची
‘अवघे विश्वचि माझे घर’ म्हणणारी
पण गावागावात गावाबाहेर
हजारो माणसं सडवत ठेवणारी
वा रे वा! सीमावादाविषयी गळे काढता
सीमावादातील लोकांची बाजू घेता
किती जातीवादी तुम्ही
हजारो वर्षे तुमच्या आमच्यातल्या
गावकुसाने ठरवलेल्या सीमा कधी पुसणार?’’
शरणकुमार लिंबाळे यांनी विचारलेला प्रश्न योग्यच आहे. किंबहुना त्यातून बाहेर पडायचा मार्ग ते सांगतात. अशा रीतीने शरणकुमार लिंबाळे यांचा टीपेचा सूर ‘तुमची जात काय’मध्ये लागलेला आहे आणि तो स्वाभाविकही आहे. पण त्याच वेळी ‘तुला मी समजून घेतलं नाही’सारख्या कवितेत ते समजूतदारपणे म्हणतात…
“तुला मी समजून घेतलं नाही
पुरुष निघालो मीही, माहीत होत्या तुझ्या मर्यादा
तुझ्या भोवती असलेल्या जातीच्या लक्ष्मणरेषा
तू ओलांडलीस हर एक वेळी पण
तुझी मर्यादा मी समजून घेतली नाही
पुरुषच निघालो मीही’’
सदर कवितासंग्रहाला अर्जुन डांगळे यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी लिंबाळेंची कविता म्हणजे विषम समाजव्यवस्थेला शरण न जाणारी कविता, असे म्हटले आहे. दलित चळवळीचा मागोवा घेतलेला आहे. त्यात ते मग शिवाजी महाराजांच्या लढय़ापर्यंत पोहोचतात. तेव्हा ते म्हणतात, “परंतु शिवाजी महाराज खऱया अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातीचे लोक म्हणजे महार, मांग, रामोशी, कोळी, मराठा, कुणबी असे विविध जातीचे लोक होते. त्यांच्या सागरी आरमाराचा प्रमुख हा मुसलमान होता.’’ तसे असेल तर अर्जुन डांगळे यांनी या मुसलमानाचे नाव द्यावे. शिवाजी महाराज प्रेमींच्या माहितीत ही नवी भर पडेल.
या संग्रहाच्या मलपृष्ठावर जी. के. ऐनापुरे यांचा ब्लर्ब आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, लिंबाळे यांच्या या पाचव्या संग्रहाचा अवकाश खोलवर प्रतिक्रियात्मक असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. शरणकुमार लिंबाळे यांचे वर्तमान जाणून घेणारे रसिक त्यांना भेटो.