रवीना टंडनचा खोटा व्हिडीओ पोस्ट केला! अभिनेत्रीने पाठवली 100 कोटींची मानहानीची नोटीस

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या कारने वृद्ध महिलेला उडवल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्या महिलेच्या मुलाने सोशल मीडियावर रवीना टंडनचा एक व्हिडिओ ट्विट केला होता, जो खूप व्हायरल झाला होता. अभिनेत्रीच्या कारने त्याच्या आईला धडक दिल्याचा दावा या व्हिडीओद्वारे त्या व्यक्तीने केला होता. घटनेच्या वेळी अभिनेत्री नशेत होती, असा आरोपही त्या व्यक्तीने केला होता. मात्र दोन दिवसांमध्येच रवीनावरील हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे या प्रकरणी अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला मानहानीची नोटीस बजावली आहे.

दरम्यान, अभिनेत्रीची वकील सना रईस खान हिने या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. अलीकडेच रवीनाला खोट्या तक्रारीत अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाला. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व्हायरल करून रवीनाची प्रतिमा खराब करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही सध्या या प्रकरणी सर्व आवश्यक कायदेशीर पावले उचलत आहोत. या संदर्भात 12 जून रोजी रवीनाने त्या व्यक्तीला 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे तिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

रवीनावरील आरोप ठरले खोटे-

जून महिन्याच्या सुरुवतीला रवीना टंडनचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. रवीनानं मद्यधुंद अवस्थेत महिलेला मारहाण केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात खार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं की रवीना विरुद्ध खार पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रवीनाच्या कारनं कोणालाही धडक दिली नाही आणि ती मद्यधुंद अवस्थेत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे अभिनेत्रीवर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत.

रवीना टंडनचा व्हायरल व्हिडीओ आणि मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा