चाकू हल्ल्यानंतर अॅसिड टाकले ; एकाचा एकाचा मृत्यू

पैशाची मागणी करत सातत्याने त्रास देत असल्याने कंटाळलेल्या व्यापाऱ्याने दोन जणांवर चाकूचा हल्ला करून जखमी केले. यातील एक जण जीव वाचवून पळून गेल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावर अॅसिड टाकले. या घटनेतील अॅसिड टाकलेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारदरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. ही घटना रत्नपूर – छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद गावानजीक असलेल्या एका हॉटेलवर मंगळवारी रात्री 11 ते 12 वाजेदरम्यान घडली. या घटनेतील तिन्ही आरोपींना रत्नपूर पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. अक्की ऊर्फ आकाश कैलास रणधीर असे मयताचे नाव आहे. जखमी तरुणाचे नाव आनंद बाबासाहेब वारे असे आहे.

आकाश रणधीर हा वेरुळ येथील रहिवासी असून, तो सध्या सातारा परिसरात वास्तव्यास होता. मंगळवारी आकाश रणधीर व त्याचा मित्र आनंद वारे हे वेरूळ येथील लॉजिंग बोर्डिंग व हार्डवेअर चे व्यावसायिक मयूर पाटणी यांच्याकडे आले. पाटणी यांच्याकडे पैशाची मागणी करत होते. त्या ठिकाणी बोलणे झाल्यानंतर कागजीपुरा नजीकच्या एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. त्याप्रमाणे आकाश रणधीर, आनंद वारे, मयूर पाटणी व नितीन ठाकरे हे एकत्र आले. रात्री साडेअकरा वाजता शेख नावेद हा त्या ठिकाणी आला. पार्टी सुरू झाल्यानंतर पैसे देण्या घेण्याचा विषय सुरू झाला. त्यावेळी पाटणी याने आकाश यास सध्या सात ते आठ हजार रुपये घे, नंतर बघू, असे म्हटले. यावर आकाशने आणखी दहा ते बारा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावरून वाद सुरू झाला. मयूरने आकाश रणधीर व आनंद वारे यांना हॉटेलच्या मागील बाजूस बोलावले. या ठिकाणी वाद वाढत गेल्याने पाटणी याने कोयत्याने हल्ला केला यामध्ये दोघे जखमी झाले. आनंद वारे याने संधी साधत मयूर जीव वाचवत पळ काढला व मित्रांच्या मदतीने घाटी छत्रपती संभाजीनगर येथे गेला. हॉटेलच्या मागे जखमी अवस्थेत पडलेल्या आकाश रणधीर याच्या अंगावर अॅसिड टाकल्याने तो गंभीर जखमी झाला. जिवाच्या आकांताने तो ओरडत असल्याने कागजीपुरा व परिसरातील नागरिकांनी हॉटेलकडे धाव घेतली. आकाशला रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत तातडीने हलविले. मात्र, त्या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मोरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तपासाची चक्रे फिरवत आरोपी मयूर पाटणी, नितीन ठाकरे व शेख नावेद तिघेही राहणार वेरूळ यांना रात्रीच ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धंनजय फराटे पुढील तपास करीत आहेत.