रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मशाल पेटणार, विनायक राऊत हॅटट्रिकसाठी सज्ज

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या 7 में रोजी मतदान होत आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक भाऊराव राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. प्रचारात इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक भाऊराव राऊत यांनी आघाडी घेतली असून ते हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज गावागावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल पेटणार आहे.

16 मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यापासून रणधुमाळीला सुरूवात झाली. 12 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यात आले.त्यानंतर प्रचारसभांचा झंझावात सुरू झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रचंड विराट सभा झाल्या. मशाल रॅलीने प्रचाराचे रान पेटवले. उमेदवार विनायक राऊत यांनी 107 खळा बैठका घेतल्या. जिल्हापरिषद गटनिहाय मेळावे जनतेशी संवाद साधला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आप पक्षाची एकजूट मतदारसंघात पहायला मिळाली.गावागावात,वाड्यावस्त्यांवर जोरदार प्रचार करण्यात आला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत, बहुजन समाज पक्षाचे राजेंद्र आयरे, सैनिक समाज पक्षाकडून सुरेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून मारूती जोशी, बहुजन मुक्ती पार्टीकडून अशोक पवार, महायुतीकडून नारायण राणे, अपक्ष शकील सावंत, अमृत तांबडे, विनायक लवू राऊत निवडणूक लढवत आहेत.

गेले दीड महिने सुरू असलेला प्रचार रविवारी सायंकाळी पाच वाजता संपला.छुपा प्रचार सुरू होणार असून कार्यकर्त्यांना डोळ्यात अंजन घालून जागे रहावे लागणार आहे.उद्या 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1942 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 14 लाख 51 हजार 630 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.